। पाली/बेणसे । वार्ताहर ।
स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने 47 वी राष्ट्रीय जलतरण, वॉटर पोलो, ड्रायव्हिंग स्पर्धा दिनांक 19 ते 23 ऑक्टोबर रोजी बेंगलोर येथे होणार आहे. या स्पर्धेकरिता स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने डेक्कन जिमखाना जलतरण तलाव पुणे येथे खुली निवड चाचणी घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये रिलायन्स फाऊंडेशनच्या जे.एच.अंबानी शाळेची व रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे हेल्थ क्लबची जलतरण तलावाची जलतरणपटू प्रेषिता दत्ताराम तरे हिची वॉटर पोलो प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली होती. हे प्रशिक्षण शिबिर डेक्कन जिमखाना पुणे येथे इंडिया वॉटरपोलोचे प्रशिक्षक दत्ताराम तरे व शौर्य करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या प्रशिक्षण शिबिरातून प्रेषिता हिची ज्युनियर मुली वॉटर पोलो महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली.