| तळा | वार्ताहर |
थंडीची चाहूल लागण्यास सुरूवात झाली की घाटमाथ्यावरील मेंढपाळ मेंढ्यांना घेऊन आपला मोर्चा कोणाकडे वळवतात. या कालावधीत कोकणात या मेंढ्यांसाठीचा पालापाचोळा चारा जंगलात मोठ्या प्रमाणात मिळत असतो. त्यामुळे मेंढ्याचे चांगल्या प्रकारे पालन पोषण उन्हाळा येईपर्यंत करता येत असल्याने मेंढ्याचे संरक्षणही चांगले होत असते. त्यामुळे हे मेंढपाळ मजल दर मजल करत कोकणातील भागात येत असून ते आता तळा तालुक्यात आले आहेत.
गरीब गरजू मेंढपाळ आपल्या मेंढ्या या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात काही ठराविक दिवस बसवितात. त्या मोबदल्यात मेंढपाळांना तांदूळ अथवा ठराविक रक्कम दिली जाते. अशाप्रकारे आठवडा दोन आठवडे एका एका शेतात रात्री या मेंढ्या बसविण्यात येऊन त्या मेंढ्याचे मळमुत्र त्या शेतात पडून शेतीचा कस वाढून शेतीचे उत्पन्न वाढते व खताची मात्रा दिली नाही तरी चालते. अशा प्रकारे मेंढपाळ शेतकऱ्यांच्या शेतात मेंढ्या बसवून पुढे पुढे वेगवेगळ्या गावात आपला प्रवास घाटमाथ्यावर पुन्हा जाईपर्यंत करत असतो. हे मेंढपाळ अशा प्रकारे मेंढ्याची व स्वतःची उपजीविका भागवतात. मार्च, एप्रिल, मे मध्ये परतीच्या प्रवासाला लागून आपल्या घरी परतत असतात. या कोकणात येणाऱ्या मेंढ्या यांच्यामुळे कोकणातील शेती सुपिक कसदार होण्यास मदत होत असते. सातारा जिल्ह्यातील पोपट पडळकर हे कोकणात तळा व मुरूड या तालुक्यात आपल्या मेंढ्या घेऊन दाखल झाले असून त्यांच्याशी संपर्क साधला असता आता आमचा मुक्काम आठ महिने या भागात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.