सरसकट नुकसान भरपाई द्या; शेतकरी कामगार पक्षाची सरकारकडे मागणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यात 26 ते 28 सप्टेंबर, 21 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत अवकाळी पाऊस पडला. या पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले आहे. भातशेतीसह नारळ, सुपारी आदी पिकांचे या पावसात प्रचंड नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, शासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी कामगार पक्षाचे लाल वादळ अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी (दि.29) दुपारी धडकले. जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेतली. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या अशी मागणी यावेळी शेकापच्या वतीने करण्यात आली. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हासह चिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप राज्य कामगार आघाडी प्रमुख प्रदिप नाईक, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, शेकाप तालुका माजी चिटणीस अनिल शांताराम पाटील, ॲड. परेश देशमुख, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, शेतकरी सभा तालुका अध्यक्ष अनिल पाटील, ॲड. निलम हजारे, आदी पदाधिकारी, विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य, महिला, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच पावसाचा फटका बसला आहे. परतीच्या पावसाने शेतांमध्ये पाणी साचले. कापणीयोग्य झालेली भात पिके पाण्याखाली गेली. कापणी केलेली पिके पाण्यात वाहून गेली. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे भात पिक, सुपारी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे पूर्ण तयार झालेले भात पिक पाण्यात आडवे पडून कणसे मोडली असून, अनेक शेतकऱ्यांच्या कापणीस ठेवलेल्या भाताच्या पिकांना कोंब येऊ लागले आहेत. रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातील बहुतांश शेतकरी वर्षातून एकदाच भाताचे उत्पादन घेतात. या पिकाच्या नुकसानीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. चौल, रेवदंडा, नागाव परिसरातील सुपारी उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने तात्काळ सरसकट पंचनामे करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील इतर भागातील भात, सुपारी, आंबा व इतर पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर्षी भात विक्री केंद्र अद्याप करण्यात आले नाही. भाताचा ठरविण्यात आलेला भाव फारच कमी आहे. त्यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी शेकापचे लाल वादळ धडकले. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी शेकापच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्यात आले. सरसकट पंचनामे करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी जावळे यांनी दिल्याची माहिती शेकाप शेतकरी सभा तालुका अध्यक्ष अनिल पाटील यांनी दिली.







