खड्डेमय रस्त्याविरोधात शेकाप आक्रमक

उरण तालुका चिटणीस यांचा आंदोलनाचा इशारा

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील खड्डेमय रस्त्याच्याविरोधात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे. शेकाप तालुका चिटणीस रवी घरत यांच्या नेतृत्वाखाली उरण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी. तसेच, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशाराही दिला.

उरण तालुक्यातील खोपटा कोप्रोली रस्ता, पिर कोन, आवरे, दास्तान फाटा ते दिघोडा रस्ता गव्हाण फाटा ते दिघोडा रस्ता या रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. त्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. तसेच रस्त्यावर उभे असलेल्या कंटेनरमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. खोपटा-कोप्रोली रस्ता खड्डेमय झाला आहे. यामुळे वाहनधारकांना खूपच त्रास होत आहे. या रस्त्यावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून सातत्याने छोटे-मोठे अपघात घडत आहेत. खोपटा-कोप्रोली रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात येते. मात्र, रस्त्याची अवस्था जैसे थे अशी आहे. खड्डेमय रस्त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. भेंडखळपासून ते कोप्रोलीपर्यंत वाहतूक कोंडी भेडसावीत आहे. याचा फटका नियमित प्रवास करणारे कामगार विद्यार्थी, व्यापारी वर्गाला बसत आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षेतेमुळे व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रस्ताची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यासाठी निधी मंजूर होऊनही अजूनही रस्त्याचे काम होत नाही, याबाबत उरण पूर्व विभागामध्ये नाराजी आहे. लवकरच या रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, असा इशारा तालुका चिटणीस रवी घरत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांना दिला आहे.

यावेळी अभियंता नरेश पवार, नरेश सोनवणे आधिकारी वर्ग उपस्थित होता. तसेच त्यांच्यासोबत मध्यवर्ती कमिटीचे सदस्य नरेश घरत ॲड. सागर कडू, सरचिटणीस यशवंत ठाकूर, पूर्व विभाग चिटणीस संदीप गावंड, सरचिटणीस सुरेश पाटील युवक अध्यक्ष विजय कडू, शंकर भोईर, महिला विभागाच्या अध्यक्षा वैशाली पाटील, नयना पाटील तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version