शेकाप-काँग्रेसची साथ कायम राहील : हर्षवर्धन सपकाळ

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्ष हा कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला वैचारिक पक्ष आहे. आगामी काळात शेकाप आणि काँग्रेस ही ताकद महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढेल. अहंकाराने मस्तवाल झालेल्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार आपण सर्वांनी केला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

सकपाळ म्हणाले, देशात इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. राजकारणात कोण कोणासोबत राहील, याबाबत अनेक चर्चा होत असल्या तरी शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस यांची वैचारिक साथ कायम राहणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे. आगामी राजकीय संघर्षात शेकापला अधिक बळ देत काँग्रेस सोबत घेऊन पुढे जाईल.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी लोकगीताच्या ओळी म्हणत शेकापशी असलेली भावनिक नाळ व्यक्त केली. शेकापचे नाव घेताच मला माझे आजोबा आठवतात. त्यांच्या कष्टाने रापलेला चेहरा, ठिगळ लावलेला शर्ट, फाटकी चप्पल आणि पायांवरील भेगा माझ्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. शेकाप म्हणजे कष्टकऱ्यांच्या घामाचा, श्रमाचा आणि स्वाभिमानाचा विचार आहे. त्यामुळे या पक्षाविषयी माझ्या मनात केवळ वैचारिक नव्हे, तर भावनिक जिव्हाळाही आहे, असे त्यांनी सांगितले.

सध्याच्या राजकारणावर टीका करत ते म्हणाले, आज विचारापेक्षा पैसा मोठा मानला जात आहे. पक्षांतर, सत्तेसाठी होणारी तडजोड आणि नीतीमूल्यांचा ऱ्हास ही चिंतेची बाब आहे. मात्र, शेतकरी कामगार पक्षाने आजही आपल्या विचारांची आणि तत्त्वांची कास सोडलेली नाही. पक्ष मोठा की लहान, यापेक्षा त्याची वैचारिक मुळे किती खोलवर रुजलेली आहेत, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी मी शेकापच्या कार्यकर्त्यांना तिरंग्याचा सलाम करतो. सकपाळ यांनी काँग्रेस आणि शेकापच्या भविष्यातील राजकीय सहकार्याचा पुनरुच्चार करत, पुरोगामी विचारांच्या या लढ्यात शेकापला अधिक बळ देत काँग्रेस पक्ष खंबीरपणे सोबत राहील, असा विश्वास व्यक्त केला.

अरे दिवानो, मुझे पहचानो… कहाँ से आया मैं हूँ डॉन!
ट्रम्प यांच्यावर सपकाळ यांची टीका
भाषणादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी “अरे दिवानो, मुझे पहचानो… कहाँ से आया मैं हूँ डॉन!” या लोकप्रिय हिंदी चित्रपटातील गाण्याची ओळ बोलून दाखवली. “जगात एक असा नेता आहे, जो स्वतःला सर्वशक्तिमान समजतो. कधी एका देशावर, तर कधी दुसऱ्या देशावर युद्धाचे सावट निर्माण करून जगात अशांतता पसरविण्याचे काम तो करत आहे. शांततेचा संदेश देण्याऐवजी हातात बंदूक घेऊन जगाने आपल्या पुढे झुकावे, अशी ट्रम्प तात्याची भूमिका आहे. ही मस्तवाल वृत्ती जगासाठी धोकादायक आहे, अशी टीका त्यांनी ट्रम्प यांच्यावर केली.
नायक नहीं, खलनायक हूँ मैं!
पंतप्रधानांवर सकपाळ यांचा निशाणा

पंतप्रधानांचे नाव न घेता हर्षवर्धन सपकाळ यांनी “नायक नहीं, खलनायक हूँ मैं!” या चित्रपटातील प्रसिद्ध संवादाचा उल्लेख करत मोदी सरकारवर टीका केली. देशाच्या पंतप्रधानांनी लोकशाही मूल्ये जपत विरोधकांचा आदर करायला हवा. शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशील भूमिका घेणे अपेक्षित असताना आंदोलने दडपण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. लोकशाहीत नायकाची भूमिका निभावण्याऐवजी विरोधकांना संपविण्याची मानसिकता धोकादायक आहे, असे ते म्हणाले.
Exit mobile version