22 पैकी 13 सदस्य शेकापक्षाचे
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वेश्वी आणि नवेदर नवगावमध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात शिंदे गटासोबत हातमिळवणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस या सर्वच पक्षांनी आघाडी केली होती. थेट सरपंचपदाच्या निवडणूकीत काही मतांच्या फरकाने पराभव स्विकारावा लागला असला तरी वेश्वी ग्रामपंचायतीमध्ये सात सदस्य शेकापक्षाचे निवडून आले आहेत. तर नवेदर नवगाव ग्रामपंचायतीत 11 पैकी 6 जागा शेकापक्षाने जिंकल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात एकुण 22 सदस्यांपौकी 13 सदस्य शेकापक्षाचे निवडून आले आहेत. विरोधी पक्षात असून देखील शेकापक्षासोबत लढा देण्यासाठी सर्व पक्षांना आपली ताकद पणाला लावूनही एकटा शेकापक्ष भारी पडला असल्याचे या लढतीवरुन दिसून आले आहे.
तालुक्यातील वेश्वी, नवेदर नवगाव, आणि कोप्रोली तीन ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहिर झाल्या होत्या. यातील कोप्रोली येथील ग्रामस्थांनी निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याने येथे निवडणूक घेण्यात आली नाही. तर नवेदर नवगाव ग्रामपंचायतीमध्ये 15 वर्षे प्रशासनानंतर निवडणूक होत होती. वेश्वी आणि नवेदर नवगावमध्ये शेतकरी कामगार पक्षाने मोठया प्रमाणावर विकासकामे केल्याने येथे शेकापक्षासोबत लढत देणे सोपे नव्हते. त्यामुळे शेकापक्षाविरोधात शिंदे गटाने भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेेस तसेच काँग्रेस या तीनही पक्षांसोबत हातमिळवणी केली. जंग जंग पछाडत साम दाम दंड भेद या नितीचा वापर करुन या निवडणूका लढण्याचा आटोकाट प्रयत्न या आघाडीने केला. दहशतीचे वातावरण तयार करीत निवडूणक अधिकार्यांना देखील मारहाण करण्यात आली.
या पार्श्वभुमीवर मतदान पार पडल्यानंतर सोमवारी मतमोजणीत वेश्वीमध्ये शेकापक्षाचे सरपंचपदाचे उमदेवार प्रफुल्ल पाटील यांचा आघाडीचे उमेदवार गणेश गावडे यांनी पराभव केला. मात्र या ग्रामपंचायतीमध्ये शेकापक्षाचे राजेंद्र राऊळ, मृदूला मगर, रविंद्र पाटील, रुपाली गुरव, आरती पाटील, अनंत मुळूस्कर, जुई शेळके या सात उमेदवारांचा विजय झाला. तर आघाडीचे चार उमेदवार निवडून आले. त्यामुळे जरी शेकापक्षाला सरपंचपदाची जागा गमवावी लागली असली तरी वेश्वीवर शेकापक्षाचे सर्वाधिक सदस्य निवडून आले असल्याने ग्रामपंचायतीवर शेकापक्षाचे वर्चस्व कायम राहिले आहे.
त्याचप्रमाणे 15 वर्षांनी निवडणूक पार पडत असलेल्या नवेदर नवगाव ग्रामपंचायतीमध्ये शेकापक्षाच्या उमेदवार अंकिता जैतू यांचा पराभव झाला असला तरी शेकापक्षाचे अनिल केंदकी, सुशील केंदकी, निखील कवळे, श्वेताली थळकर, स्नेहता लडगे, गणपत हुले हे सहा सदस्य विजयी झाले आहेत. तर आघाडीने पाच जागांवर विजय मिळवला आहे. मात्र येथील सरपंचपदाच्या आघाडीच्या उमेदवार या प्रभाग क्र. 2 आणि प्रभाग क्र 4 मधून देखील निवडून आल्या आहेत. मात्र त्यांना या दोन्ही जागांवरील राजिनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे येथे तीन सदस्यच आघाडीचे राहणार आहेत. त्यानंतर होणार्या पोटनिवडणूकीत पुढील चित्र स्पष्ट होईल.