महावितरण कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यात सतत होणारे भारनियमन येत्या आठ दिवसांत कमी न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
मागील अनेक दिवसांपासून उरण तालुक्यातील विविध विभागातील वीज खंडित होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे येथील नागरिक, विद्यार्थी, छोटे व्यावसायिक यांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे उरणमधील अघोषित भारनियमन त्वरित थांबवून नागरिकांना नियमित वीजपुरवठा करावा, अशी मागणी महावितरण कंपनीकडे करण्यात आली आहे. तसे न झाल्यास शेकापच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने उरण महावितरणचे अधिकारी व उरण पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शेकाप महिला उरण तालुका अध्यक्ष सीमा घरत, माजी उपनगराध्यक्ष नाहीदा ठाकूर, माजी नगरसेवक अशफा मुकरी उपस्थित होत्या.