अलिबाग शहर शेकापक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार जयंत पाटील यांची ग्वाही
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली सर्व टिमने एकदिलाने काम केले असून अलिबाग शहराचा विकास शेकापक्षाच्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील, जयंत पाटील आणि पंडित पाटील या तीन आमदारांच्या वेगळ्या भुमिकेतूनच शक्य झाला आहे. भविष्यातील नवीन विकास आराखड्याचा परिपुर्ण उपयोग करुन चटई निर्देशांक (एफएसआय) 4 वर नेण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करुन अलिबागचा आणखी सर्वांगिण विकास करण्यासाठी शेकाप कटिबद्ध असेल अशी ग्वाही शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिली.
अलिबाग शहरातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी शेकाप नेत्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी आमदार धैर्यशिल पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा चिटणीस अॅड आस्वाद पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते शंकरराव म्हात्रे, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद सदस्य चित्रा पाटील, माजी सदस्य संजय पाटील, उपनगराध्यक्ष अॅड मानसी म्हात्रे, गटनेते तथा शेकापचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रदीप नाईक, माजी सरकारी वकील अॅड प्रसाद पाटील, शरह चिटणीस अशोक प्रधान यांच्यासह शहरातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी, शेकाप महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
आमदार जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात शहरातील विकास कामांची माहिती दिली. गेल्या 20 वर्षांत जे जे नागरिकांनी सांगितले ती कामे केली. शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे खरे काम मीनाक्षी पाटील यांचे आहे. शहरात विविध योजना त्यांनी सुरु केल्या. मात्र शहरातील 70 टक्के फ्लोटींग पॉप्युलेशन ही फक्त पर्यटकांमुळेच नव्हे तर जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने कामानिमित्त शहरात येणार्या नागरिकांमुळे शहरावर अतिरिक्त बोजा पडतो. साडेतीन कोटींची घरपट्टी आणि दीड कोटींची पाणी पट्टी पैकी 50 टक्क्यांचीच वसूली होते. मात्र कटाक्षाने पाणीपट्टी आम्ही कधी वाढू दिली नाही तर माफ करण्याचाच प्रयत्न केला. शहरासाठी येणारे पाणी वायशेतहून येत असताना त्यातील 30 टक्के पाण्याची चोरी होत असल्याचे त्याचा बोजा नगरपालिकेवरच पडत आहे. भविष्यात जलपाड्याहून पाईप लाईन आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. नगरपालिकेच्या उत्पन्नातील 20 टक्केच पैसे वापरण्यासाठी मिळतात. त्यामुळे आमदारकिच्या ताकदीवरच जास्तीत जास्त निधी आणून शहराचा विकास शेकापच्या माध्यमातून करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूकीत काहींना शेकाप लहान वाटत असला तरी प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थीपणे काम करणार्या पक्षाचाच विजय होतो असेही त्यांनी यावेळी नमुद केले. भुयारी गटार योजनेसाठी मीनाक्षी पाटील यांनी आपल्या आमदारकी वेळी निधी आणला होता. मात्र राज्यातून केंद्राकडे योजना गेल्याने तो निधी परत गेला. शहरातील बाजार, कोळीवाडा येथे अधिक पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. एमएमआरडीए तून रामनाथ येथील तलावाचे सुशोभिकरण करुन मॉर्निंग ट्रॅक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. तिथून निधी मिळाला नाही तर आमदार निधीतून या परिसराचा विकास करण्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला. शहरात मत्स्यालय उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्यात पौराणिक, इतिहास आधारीत माहिती देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शहराचा विकास करताना एकही न्यायालयीन केस होऊ दिली नाही तर समंजसपणे तडजोड केली. शहरातील चटई निर्देशांक (एफएसआय) सातत्याने कसा वाढविता येईल यासाठीच प्रयत्न केले गेले. आमदार म्हणून प्रभाव पाडू शकत असल्यामुळेच हे शक्य होते. विधीमंडळात सातत्याने बोललो तरच अशा प्रकारचे काम करता येते. मुंबई कोळीवाड्यांप्रमाणेच अलिबागमध्ये देखील एफएसआय मिळाला पाहिजे ही आपली मागणी आहे. कोळीवाड्याचा विकास व्हावा ही भुमीका सातत्याने घेतली आहे. पर्यटनवाढीच्या दृष्टीने शहरातील हॉटेल व्यवसाय वाढविण्याचा देखील प्रयत्न करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
उपनगराध्यक्षा अॅड मानसी म्हात्रे यांनी पाच वर्षातील विकास कामांचा आढावा घेताना अलिबागचे उत्पन्न घरपट्टी आणि पाणीपट्टी याच्यावर अवलंबून असतानाही पाच वर्षात त्यात वाढ होऊ दिली नाही. तसेच वसूलीसाठी कधीही सक्ती केली नाही. शहराच्या रचनात्मक विकासात मीनाक्षी पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्याबरोबरीने जयंत पाटील, पंडीत पाटील यांनी भरीव विकास निधी दिल्यानेच शहराचा अमुलाग्र बदल होऊ शकला. प्रशांत नाईक यांच्या रुपाने जाणता नगराध्यक्ष लाभल्याने शहराचा चौफेर विकास होऊ शकल्याचे त्यांनी नमुद केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केले. सुत्रसंचलन गटनेते प्रदीप नाईक यांनी केले.
टिम प्रशांत नाईक यांच्या कार्याचे कौतुक
नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखालील टिमचे कौतुक करताना आ. जयंत पाटील म्हणाले, अलिबागकरांनी चांगली टिम निवडली. पाच वर्षात एकही डाग पडू दिला नाही. 8 दिवसांवर कोणाचीही फाईल अडविली नाही. एकही वाद नाही की नाराजी नाही याबाबत समाधान व्यक्त केले. 85 सालापासून अलिबाग शहरात शेकापची सत्ता आली. 24 वर्षात 18 पैकी 18 नगरसेवक निवडून आले हीच कामाची पोचपावती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कोळी समाजाला त्यांचे हक्क मिळाले पाहिजे
आरक्षणाच्या लढाईत कोळी समाजाला त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत. कोळी समाजाची जनगणना करताना महादेव कोळी नाही तर डोंगर कोळी असा उल्लेख करावा लागणार आहे. जातीमुळे कोळी समाजावर होत असलेला अन्याय थांबवून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रसंगी लढा देण्याची तयारी आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली. कोळीवाड्यासाठी दोन्ही बाजूने बंदरे बांधायचा मानस व्यक्त करतानाच आक्षी आणि नवगावमध्ये देखील बंदरे बांधणार असल्याचे सांगितले.
अलिबागपणे टिकले पाहिजे
बबदलल्या शहरीकरणात अलिबाग शहराचे अलिबागपण टिकले पाहिजे. तिसरी मुंबई होऊ घातली आहे. अलिबाग हे सेंकड होम असताना आता बंगलेवाले अपडाउन करीत आहेत. त्यामुळे भविष्यात खरे मालम वंचित राहण्याची भीती आ. जयंत पाटील यांनी व्यक्त करतानाचा सर्वांनी एकत्र राहून अलिबागचे अलिबागपण कायम राहण्यासाठी प्रयत्न करु या असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.