जनहितासाठी शेकापची गरज: अभिनेत्री श्रेया बुगडे

अलिबागच्या महाभोंडल्यात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; पारंपरिक संस्कृतीचा जागर

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

कष्टकरी, वंचित आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते व कार्यकर्ते सातत्याने काम करीत आहेत. जनतेच्या हितासाठी झटणाऱ्या या नेतृत्वाची समाजाला गरज असून, त्यांच्या कार्याला कायम पाठबळ मिळणे आवश्यक आहे, असे आवाहन मराठी सिनेअभिनेत्री श्रेया बुगडे यांनी केले.

नवरात्रोत्सवानिमित्त शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग शहर महिला आघाडीच्या वतीने बुधवारी (दि.14) सायंकाळी श्रीबाग येथील स्व. नमिता नाईक क्रीडा संकुलात महाभोंडला आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या श्रेया बुगडे यांनी महिलांशी संवाद साधताना शेकापच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.


या कार्यक्रमाला अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, शेकाप महिला आघाडी प्रमुख तथा उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, श्रेया बुगडे यांच्या मातोश्री नूतन बुगडे, माजी नगरसेविका वृषाली ठोसर, संजना कीर, शेकाप अलिबाग शहर महिला आघाडी प्रमुख ॲड. नीलम हजारे, सहप्रमुख ॲड. अश्विनी ठोसर, शैला भगत, ॲड. निवेदिता वाघमारे, सुषमा पाटील, संध्या पालवणकर, योजना पाटील, पंचायत समिती सदस्या अंजली ठाकूर, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, परीक्षक लक्ष्मीभाभी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शेकाप नेत्या तथा माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील आणि अलिबागच्या माजी नगराध्यक्षा स्व. नमिता नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन, ऐरावत पूजन आणि कुमारिका पूजन करून महाभोंडल्याला सुरुवात झाली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी महाभोंडल्यात उत्साहाने सहभाग घेतला. नृत्यांच्या सादरीकरणातून पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपण्यात आला. महिला, तरुणी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

महिलांचा उत्साह कौतुकास्पद!
महिलांशी संवाद साधताना श्रेया बुगडे म्हणाल्या की, अलिबाग हे त्यांच्या आईचे माहेर असल्याने ते त्यांचे आजोळ आहे. शेकापच्या वतीने आयोजित महाभोंडल्याच्या कार्यक्रमात मान्यवर म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. महाभोंडल्याच्या निमित्ताने अनेक महिला पारंपरिक वेशभूषेत सजून उत्साहाने सहभागी झाल्या आहेत. दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळतानाच अशा कार्यक्रमांत त्याच उमेदीने सहभागी होण्याची महिलांची वृत्ती कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
अलिबागचे नाव जगाच्या नकाशावर
अलिबागच्या बदलत्या स्वरूपाविषयी बोलताना श्रेया बुगडे म्हणाल्या की, अलिबागचा मोठ्या प्रमाणात कायापालट झाला आहे. पुर्वी अलिबाग से आया क्या असे बोलून हिणवले जायचे, मात्र पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या अलिबागमध्ये आज स्वतःचे छोटेसे घर असावे, यासाठी मोठ-मोठे सेलिब्रिटी, व्यावसायिक, क्रिकेटर अशी सर्वच मंडळी धडपडत आहेत. पर्यटनस्थळ म्हणून अलिबागने देश-विदेशातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अलिबागचे नाव जगाच्या नकाशावर वेगळ्या उंचीवर पोहोचल्याचे समाधान असल्याचे श्रेया बुगडे यांनी सांगितले.
Exit mobile version