अॅड. मानसी म्हात्रेंचा पुढाकार; जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे यांनी पुढाकार घेतला आहे. मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्टमार्फत महिलांना कायदे, शैक्षणिक, रोजगार, प्रशासकीय कामकाज व इतर अधिकारांबाबत विनामूल्य मार्गदर्शन व सेवा दिली जाणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शनिवारी (दि.8) अलिबागमध्ये कामत आळी येथे या ट्रस्टचा शुभारंभ करण्यात आला. मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्टच्या सेवा फलकाचे उद्घाटन जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील, जिल्हा ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. तसेच, मोफत सल्ला केंद्राचे उद्घाटन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, जिल्हा ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील, लोकनेते अॅड. दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या अॅड. निलम हजारे, अलिबागच्या माजी नगरसेविका वृषाली ठोसर, संजना कीर, प्रिया वेलणकर, अश्विनी पाटील, पल्लवी आठवले, स्नेहल म्हात्रे आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिलांच्या कौटुंबिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय सर्वांगीण विकासासाठी मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्ट सुरू करण्यात आली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून महिलांना कायदेविषयक सल्ला, कौटुंबिक समस्यांवर मार्गदर्शन, शैक्षणिक उपक्रमांसाठी मार्गदर्शन, शासकीय योजनांविषयक माहिती, शासकीय यंत्रणेशी संबंधित कामात मदत, रोजगारविषयक मार्गदर्शन, आरोग्यविषयक समस्यांवर मार्गदर्शन, कौटुंबिक मिळकतीतील कायदेशीर अधिकारांवरील सल्ला, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण या सर्व सेवा विनामूल्य देण्यात येणार आहे, अशी माहिती अॅड. मानसी म्हात्रे यांनी दिली.