आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दिवस संपूर्ण जगभरात स्त्रीशक्तीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. महिलांचे हक्क, त्यांचे योगदान आणि समाजातील त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे. शिक्षण, विज्ञान, राजकारण, कला, क्रीडा आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांत त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. अशा कर्तृत्ववान महिलांचा महिला दिनानिमित्त गौरव करण्यासाठी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांच्या संघर्षाचा गौरव

| शिहू | वार्ताहर |
प्राथमिक शाळा शिहू व ग्रामपंचायत कार्यालय शिहू येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांच्या संघर्षाचा, कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. यावेळी प्राथमिक शाळा शिहूच्या विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा साकारून याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापण कमिटीच्या उपाध्यक्षा मोहिनी पाटील, सहशिक्षिका स्वाती पाटील, सदस्य शिल्पा भोईर, वैशाली घासे, कविता म्हात्रे, भारती म्हात्रे, रंजना म्हात्रे उपस्थित होत्या.
विद्यार्थिनींना पुस्तक भेट

| पाली/गोमाशी | वार्ताहर |
संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यालयातील महिलांना आणि विद्यार्थिनींना गुलाब पुष्प आणि पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शिक्षिका सोनल ठकोरे आणि विद्या भिसे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. यावेळी प्रा. बबन पालवे, शिक्षक अशोक शिंदे, आकाश ठाकूर, महेंद्र निकुंभ, नागेश सायगावकर, शिक्षिका स्वाती शिंदे, तन्मयी शिंदे, सोनल ठकोरे, शामल कंबलकर, अंकिता खैरे, मंगल खैरे आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी

| पनवेल | प्रतिनिधी |
महिला पोलीस अधिकारी कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राखणे हे आपले कर्तव्य आहे. येत्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खारघरच्या मदरहुड हॉस्पिटलने नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालयात महिला पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी केली. या शिबिरांतर्गत सुमारे 300 महिला पोलिस कर्मचार्यांची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी पोलीस आयुक्त मिलिद भारंबे आणि डीसीपी रश्मी नांदेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला पोलिसांनी त्यांच्या आरोग्याबाबत जागरुक राहावे आणि वेळेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविता याव्यात यासाठी रुग्णालयाने संपूर्ण रक्त गणना (सीबीसी), कॅल्शियम, थायरॉईड पॅनेल, पॅप स्मीअर आणि बोन मिनरल डेन्सिटी (बीएमडी) चाचणी यासारख्या आवश्यक चाचण्या केल्या. मदरहुड हॉस्पिटलने याठिकाणी महिला पोलिसांची आरोग्य तपासणी करत महिला त्यांच्या आरोग्याविषयक समस्या दूर करण्यासाठी तसेच त्यांना जागरुक या विशेष उपक्रम राबविला. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची टिम ज्यामध्ये डॉ. प्रतिमा थमके, डॉ. सुरभी सिद्धार्थ, डॉ. अनुजा थॉमस आणि डॉ. श्रुती उग्रन यांचा समावेश होता. त्यांनी महिला पोलिसांची तपासणी करत त्यांच्या शंकांचे निरसन करुन योग्य मार्गदर्शन केले.
महिला दिन उत्साहात साजरा

| उरण | वार्ताहर |
इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, उरण येथे शुक्रवारी, दि. 7 मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक राजू ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इतकरे, नितीन पाटील आणि ए.पी.आय. सतीश गोरे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात रुग्णालयातील सफाई कामगार मोनिका जाधव, प्रियांका मसे, रासिका पाटील आणि वस्त्र धुलाई कर्मचारी रजनी काटे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांना गिफ्ट, रोपटं आणि आर्थिक मदत देऊन त्यांच्या मेहनतीची दखल घेतली. विशेष म्हणजे, त्यांना मंचावर प्रमुख अतिथींसोबत मानाचे स्थान देण्यात आले. यावेळी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी.एम. कालेल आणि संपूर्ण कर्मचारी वृंद या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा

| म्हसळा | वार्ताहर |
पीएमश्री प्राथमिक शाळा नं. 1 येथे वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये नगरसेविका राखी करंबे, बिचुकले मॅडम, किशोरी बनकर, कोमल वसावे, निधी दर्गे, समिधा वेदक, रजनी जोशी, मोनिका अमोल कांबळे, निशा चव्हाण, रेश्मा पवार, श्रीम. जाधव आदी महिलांचा सन्मान करण्यात आला. महिला दिनानिमित्त आयोजित बाल आनंद मेळाव्यात विद्यालयातील 20 ते 25 विद्यार्थ्यांनी खाऊचे स्टॉल लावले होते. तर या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान वाढण्यासाठी उपक्रम राबवल्याचे मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर यांनी सांगितले.
दिव्यांग महिलांना धनादेश वाटप

| नेरळ | प्रतिनिधी |
महिला दिनाच्या निमित्ताने नेरळ ग्रामपंचायतीकडून आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होता. महिला दिनाचे निमित्ताने महिला ग्रामसभा आणि त्यानंतर ग्रामपंचायत मधील दिव्यांग निधीचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रशासक सुजित धनगर तसेच ज्येष्ठ महिला कर्मचारी आणि एका ज्येष्ठ महिला नागरिकांच्या हस्ते ग्रामसभेच्या सुरुवातीला राजमाता जिजामाता भोसले,सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार घालून करण्यात आली. या ग्रामसभेत नेरळ ग्रामपंचायतीमधील 38 दिव्यांग यांना प्रत्येकी पाच हजारांचा निधीचा धनादेश बँक खात्यात जमा करण्यात आला. त्याचवेळी महिला दिव्यांग यांना याच ठिकाणी धनादेश वितरित करण्यात आले. या ग्रामसभेला महिलांची मोठी गर्दी होती.
आकांक्षा हगवणे यांचा सन्मान

। अलिबाग । वार्ताहर ।
कोकणस्थ परिवार पुण्याच्यावतीने युगांडा येथे झालेल्या जागतिक विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत महिला गटात सुवर्णपदक मिळविणारी पहिली भारतीय खेळाडू आकांक्षा हगवणे हिचा सत्कार संस्थेचे संचालिका क्रांती शितोळे यांच्या हस्ते पंडित नेहरू स्टेडियम येथे करण्यात आला. आकांक्षा हगवणे रशिया येथे 2016 मध्ये झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत 16 वर्षाखालील मुलींमध्ये जगजेतेपद पटकवणारी पहिली भारतीय खेळाडू आहे. सध्या आकांक्षा भारती विद्यापीठात इंग्रजीमध्ये स्टडी ऑफ ऑटोबायोग्राफी या विषयावर पी.एचडी करीत आहे. श्वेता गानू यांनी उपस्थित यांचे स्वागत केले. सोनिया नेवरेकर यांनी प्रास्ताविक केले आणि प्रिया पेडणेकर यांनी आभार मानले.