जयंतभाई यांनी आदेश दिल्यास कर्जतमध्ये शेकाप लढायला तयार

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची ताकद नक्कीच कोणत्याही पक्षाला उमेदवार विजयी करण्यासाठी निर्णायक आहे. मात्र महाविकास आघाडी शेतकरी कामगार पक्षाचा सन्मान ठेवणार नसेल तर पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यास कर्जतमध्ये शेतकरी कामगार पक्ष लढ्याला तयार आहे असा निर्धार शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते पुंडलिक शिनारे यांनी कार्यकर्ता बैठकीत दिला.शेकापच्या कर्जत तालुका बैठकीत सभा अध्यक्ष म्हणून शिनारे बोलत होते. दरम्यान, पक्षाने आम्ही काय करावे असा आदेश द्यावा आणि आपली ताकद अन्य पक्षांना दाखवण्याची संधी द्यावी असा ठराव कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत करण्यात आला.

कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षाची सर्वसाधारण सभा नेरळ येथील शेतकरी भवन मध्ये आयोजित करण्यात आली होती.जेष्ठ कार्यकर्ते पुंडलिक शिनारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे,तालुका,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश फराट,जेष्ठ कार्यकर्ते पुंडलिक शिनारे,बाजार समितीचे माजी सभापती गजानन पेमारे,अशोक भुसाल,विठ्ठल भुंडेरे,महिला तालुका अध्यक्ष जयवंती हिंदोळा,युवक अध्यक्ष महेश म्हसे,नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटी अध्यक्ष राजेंद्र विरले,बाजार समिती संचालक संतोष वैखरे,उप सभापती रवींद्र झांजे,जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्र हजारे,अलिबाग अर्बन बँकेचे संचालक अनिल जोशी,विष्णू कालेकर,कृष्णा बदे,रमाकांत जाधव,कृष्णा भगत आदी मान्यवर उपस्थित होते.कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मागणीनंतर तालुका कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.

जिल्हा बँकेचे माजी संचालक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश फराट यांनी यावेळी बोलताना आपल्या पक्षाची हक्काची जागा असलेली सांगोला विधानसभा मध्ये आपल्या पक्षाला उमेदवारी मिळणार नसेल तर पक्षाने येणार्‍या सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याची गरज आहे.पक्ष टिकवून ठेवायचं असेल तर आपण स्वबळावर निवडणुकीला सामोरे जावे लागेल अशी भूमिका पक्षाने जिल्हा नेतृत्व यांना कळवायला हवी अशी मागणी केली.तालुका उपाध्यक्ष रवींद्र भोईर यांनी 24 तासात पक्षाचे 200हून अधिक सक्रिय कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आले आहेत,त्यामुळे पक्ष संपला आहे हे बोलणारे यांना मोठी चपराक असून निवडणुकीत आपण ते दाखवणार आहोत.विभाग चिटणीस पांडुरंग बदे यांनी आपल्या पक्षाने भूमिका जाहीर करण्याआधी पक्षाला कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत काय देणार हे जाहीर करायला हवे.या मतदारसंघात शेकाप ची ताकद निर्णायक असून शेकापला बरोबर घेतल्याशिवाय कोणाचाही आमदार होणार नाही असा ठाम विश्‍वास व्यक्त केला.आपण ज्यांना मदत करणारा ते निवडून आल्यावर काय देणार हे आधी वदवून घ्यायला हवे कारण नंतर ते आपल्याला जवळपास येऊ देत नाही अशी खंत पांडुरंग बदे यांनी व्यक्त केली.

अल्पसंख्याक सेल जिल्हा उपाध्यक्ष बबन भालेराव यांनी आपण मतदारांपर्यंत जावून कार्यकर्त्यांना भेटून आपली भूमिका पटवून द्यायची आहे. कार्यकर्ते संभ्रमात असून पक्षाने आपली भूमिका पक्ष आयात उमेदवार देण्याचा विचार करणार असेल तर लवकर निर्णय घ्यावा,पक्षाचा निर्णय आम्हा कार्यकर्त्यांना मान्य असेल असे जाहीर केले.विष्णू कालेकर यांनी पक्षाने भूमिका जाहीर करावी कारण कर्जत विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची भूमिका किंग मेकर ची असल्याने पक्षाने आम्हाला कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका जाहीर करावी असे आवाहन कालेकर यांनी केले.आदिवासी कार्यकर्ते दत्तायत्र निरगुडा यांनी आपल्या पक्षाचा वापर केला जात असून आपल्याला गाजर देण्याचे काम आपले मित्र पक्ष आणि विरोधी पक्ष देखील करीत आहेत.त्यामुळे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांभाळून राहावे अशी विनंती केली.विभाग अध्यक्ष महेश कोळंबे तसेच कर्जत शहर चिटणीस श्रीकांत आगीवले यांनी अनेक वर्षे आपण मदत केलेले पक्ष आपल्याला नंतर विचारत नाहीत आणि त्यामुळे आपले नेतृत्व तयार झाले नाही.आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेत असून आपण जनतेला सामोरे गेलो तर आणखी काही वर्षांनी आपला आमदारकीचा उमेदवार तयार होईल असा विश्‍वास व्यक्त केला.

सभा अध्यक्ष पुंडलिक शिनारे यांनी पक्ष डबघाईला आला असल्याचे कोणी म्हणत असेल तर शेतकरी कामगार पक्ष त्यांना आमची काय ताकद आहे हे दाखवून देऊ शकतो. त्याचवेळी आम्ही लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार विजय होणार असे जाहीर केले होते आणि शेकापच्या कार्यकर्त्यांना आघाडीवर राहून आघाडीच्या उमेदवाराला आघाडी मिळवून दिली आहे.हे महाविकास आघाडी ने लक्षात ठेवायला हवे,मात्र तुम्ही फक्त आमचा वापर करणार असाल तर आम्हीदेखील आता ते सहन करणार नाही आणि पक्षाने कर्जतमध्ये शेकापची काय ताकद आहे हे या बैठकीतील तोलामोलाचे कार्यकर्ते पाहिल्यावर कळून येईल. त्यामुळे शेकाप नेतृत्वाचा सन्मान महाविकास आघाडी ठेवणार नसेल तर मात्र कर्जतमध्ये पक्षाने आदेश दिल्यास शेकाप लढायला तयार आहे आणि आमची तशी इच्छा आहे असा निर्धार या बैठकीत व्यक्त केला.

Exit mobile version