| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत आणि खालापूर तालुक्यातील जनतेमध्ये शेतकरी कामगार पक्षाबद्दल प्रेम आहे. त्यामुळे 35 वर्षांनंतर पुन्हा कर्जतवर लाल बावटा फडकविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्वात सुपीक मतदारसंघ म्हणून पायाभरणी करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी वेळ देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मजबूत पक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये पडलेली फूट आणि शेकापसाठी पोषक वातावरण तयार करून कदाचित पाटील कुटुंबाचा एक कार्यकर्ता कर्जत विधानसभा मतदारसंघात उमेदवारदेखील असून शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे.
रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचे तीन-तीन आमदार असताना कर्जत आणि खालापूर तालुक्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले. कर्जत तालुक्यावर आदिवासी तालुका असल्याची छाप होती. कार्यकर्तेही फारसे उभे केले गेले नाहीत. कोणत्याही कारणाने का होईना पण कर्जत तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची वाढ झाली नाही, हे सत्य आहे. त्यात प्रवीण पाटील यांनी पक्ष कार्यकर्त्यात पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्यास सुरुवात केलेली असतानाच त्यांचे कोरोना काळात निधन झाले आणि त्या दोन वर्षात शेतकरी कामगार पक्ष होता त्या स्थितीत राहिला. आता मात्र शेकापकडून पुन्हा एकदा मोर्चेबांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांचे संघटन सुरु करण्यात आले आहे. कर्जत आणि खालापूर तालुक्यात पक्ष बांधणी केली तर पक्षाला चांगले दिवस येऊ शकतात असे शेकापच्या नेत्यांना वाटू लागले आहे. शेकापची पाळेमुळे कर्जत तालुक्यात किती घट्ट बसली आहेत, हे शेकाप नेत्यांनी अलिकडेच तालुक्याच्या मेळाव्यात अनुभवले आहे.
शेकापचे संस्थापक भाऊसाहेब राऊत हे याच कर्जतमध्ये वाढले आणि त्यांनी पक्ष संघटना बांधणी सुरु केली होती. इथे आजवर मजबूत असलेली शिवसेना दोन गटात विभागली आहे, तर आमदारकी गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मरगळ आली आहे. तर राष्ट्रीय काँग्रेस कर्जत आणि खालापूर तालुक्यात खिळखिळी झाली आहे. असे असताना राजकीय फायदा उठविण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील स्वतः मैदानात उतरले आहेत. त्यात जयंत पाटील यांचे लहानपण याच तालुक्यात गेले असून, त्यांनी आपल्या आजोळच्या कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांना बळ देण्यास शेकापच्या नेत्यांनी वेळ देण्यास सुरुवात केली आहे.
कर्जत तालुक्यात कार्यकर्त्यांची फळी सक्षम असून, मतदारांना पक्षामध्ये थोपवून ठेवण्याची किमया साधली आहे. आमदार, खासदार पक्षाचा नसल्याने कोणतेही निधी मिळण्याचे पाठबळ नसताना मतदार अजूनही खटारा म्हणजे शेकाप सोडून जात नाही. याउलट, तालुक्यात अन्य पक्षांमध्ये थोडेसे काही बिनसले की कार्यकर्ते दुसर्या पक्षाची कास धरतात याची अनेक उदाहरणे असून, शेकापचा कार्यकर्ते मात्र त्याबाबतीत पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे शेकापचे नेते जयंत पाटील यांनी खोपोली नगरपरिषदेमध्ये दहा वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे संख्याबळ मिळाले होते तसे यश मिळविण्यासाठी पुन्हा एकदा आगेकूच सुरु केली आहे. तर माथेरानमध्ये मतदारांना पुन्हा एकदा शेकापच्या पारड्यात यश द्यावे यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा काढण्याचे नियोजन शेकापकडून सुरु आहे. माथेरानमध्ये केवळ एकच बँक असून, जिल्हा बँकेची शाखा उघडावी यासाठी माथेरान पतसंस्था बरीच वर्षे मागणी करीत आहे.