| अलिबाग | प्रतिनिधी |
शेकापच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या व मीडिया सेल अध्यक्षा चित्रलेखा पाटील आणि महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी शनिवारी (दि.13) अलिबाग-वडखळ रस्त्याच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत स्थानिक शेकाप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी नागरिकांकडून या रस्त्यावरील वाहतूक कोंडी, खड्डे, अपघातांचा धोका आणि अपूर्ण कामामुळे होणाऱ्या अडचणींबाबत माहिती घेतली.
याप्रसंगी चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, अलिबाग-वडखळ रस्ता हा रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शासन व संबंधित विभागाने तातडीने कामाचा वेग वाढवून हा रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावा, अशी आमची ठाम मागणी आहे.
तसेच, ॲड. मानसी म्हात्रे म्हणाल्या की, या रस्त्यावर वाहतुकीच्या अडचणींमुळे रात्री प्रवास करणाऱ्या महिला व विद्यार्थ्यांना मोठा धोका निर्माण होतो. तातडीने लक्ष देऊन हा प्रश्न निकाली काढावा.
दरम्यान, अलिबाग रस्ते संघर्ष समितीने दिलेल्या इशाऱ्यानंतरच या कामाला सुरुवात झाली असल्याचा उल्लेख करण्यात आला. समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासन जागे झाले असून स्थानिक नागरिकांनी या हालचालीचे स्वागत केले आहे.







