नौटंकी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना चपराक- पंडित पाटील

| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील शेतकरी, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत शेकाप नेते जयंत पाटील यांनी विधीमंडळात आवाज उठवला आहे. उसर, शहापूरसह अन्य भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत. नौटंकी करणाऱ्या सरकारमधील लोकप्रतिनिधींना जयंत पाटील यांनी चपराक दिली आहे. शेतकरी कामगार पक्षच महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोबत आहे. हे शेकाप नेते आ. जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा सिध्द केले आहे, असे प्रतिपादन माजी आ. पंडित पाटील यांनी शुक्रवारी केले.

रायगड जिल्ह्यातील महाड, रसायनी, उसर, शहापूर येथील हजारो एकर जमीन प्रकल्पाच्या नावाने कवडी मोल भावाने विकत घेतल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. विद्यमान सरकार कवडीमोल भावात शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन सर्वसामान्यांच्या दिशाभूल करीत आहे. रायगड जिल्ह्यात गल्लोगल्ली पक्ष आहेत. स्वयंघोषित नेते आहेत. पण शेकाप नेते आ. जयंत पाटील गरिबांसह शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून ठामपणे भूमिका घेत आहेत. दि.बा. पाटील, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी जेएनपीटीविरोधात आंदोलन केले होते. साडेबारा टक्के विकसित भूखंड मिळाला पाहिजे ही मागणी त्यावेळी त्यांनी केली होती. त्यामुळे उरण, पनवेल परिसरातील शेतकरी आज चांगल्या स्थितीत आहेत.

शहापूर येथे 2000 साली टाटा कंपनीने जागा घेतली. त्याला 23 वर्षे पूर्ण झाली आहेत. पेण तालुक्यातील सेझची जमीन कवडीमोल भावाने घेतली. या दोन्ही ठिकाणी कोणताही प्रकल्प आला नाही. राज्य सरकारने त्या जमिनीवर एमआयडीसीचे शिक्के मारले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप पंडित पाटील यांनी केला.

शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत शेकाप नेते जयंत पाटील यांनी सभागृहात विषय मांडला आहे. विधानपरिषदेच्या सभागृहाने याबाबत एक तास चर्चेला वेळ दिला आहे. यातून शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फुटणार आहे. परंतु जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बाजूने दिसत नाहीत. ते फक्त नौटंकी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधी सरकारमध्ये आहेत. त्यांच्या पक्षाचे मंत्री आहेत.मग कॅबिनेटच्या सभेत शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका का घेत नाही, असा संतप्त सवाल पाटील यांनी उपस्थित केला.

Exit mobile version