फसवणूकीविरोधात शेकापचा मोर्चा

शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी पदाधिकारी रस्त्यावर

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

पळस्पे येथील शेतकऱ्याची मिळकतीमधील 13 गुंठे जमीन बळकावण्यात आली असून, अनेक वर्षांपासून शेतकरी पीकांपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे चूकीच्या पद्धतीने सातबारा उताऱ्यावर नोंद करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली, या विरोधात शेकापचे नेते माजी आ. बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापचे जिल्हा शेतकरी सभा अध्यक्ष अनिल ढवळे यांनी आवाज उठविला आहे. शेतकऱ्याच्या न्यायासाठी शेकापच्यावतीने शुक्रवारी (दि.30) पनवेलमधील तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सातबाऱ्यावरील चुकीची नोंद रद्द करून शेतकऱ्याला पुर्ववत जमीन करून देण्यात यावी, अशा अनेक मागण्यांसाठी शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, असून याबाबत त्यांनी पनवेल तहसीलदारांना निवेदन दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल तालुक्यातील पळस्पे येथील पांडूरंग बाळू पाटील उर्फ घोरपडे या शेतकऱ्याची सर्व्हे नंबर 79/1 मध्ये 183 गुंठे जमीन आहे. याच गटामध्ये बेडेकर यांचे 40.5 आर एवढी मिळकत होती. बेडेकर यांनी पळस्पे येथील शेतकरी नाना भगत यांना 1983 मध्ये ही मिळकत विकत दिली. त्यानंतर भगत यांनी मोजणी न करता, 26 जूलै 1994 मध्ये पनवेल येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पंधरा पानी खरेदीखत बनवून शकुंतला सामंत यांना 40.5 आर क्षेत्राची मिळकत विकली. त्यानंतर सामंत यांनी 17 जून 2006 रोजी विनामोबदला बक्षीस पत्राने मनिषा सामंत, सुहास सामंत यांना ती जमीन दिली. मात्र, सुहास सामंत यांनी या जमीनीचा सर्व्हे करून सातबारा उताऱ्यामध्ये बदल घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेतकरी पांडूरंग पाटील यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेत सर्व्हे अधिकारी आणि सामंत यांनी कोऱ्या कागदावर शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन मिळकत लाटण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही करण्यात आला आहे. त्यांनी 40.5 ऐवजी 53.10 आर इतकी मिळकत घेऊन शेतकऱ्याची मोठी फसवणूक केली आहे.

पांडूरंग पाटील या शेतकऱ्याने सामंत यांच्या सोबत जमीनीचा कोणत्याही प्रकारे व्यवहार केला नसतानाही त्यांच्या मिळकतीमधील 13 गुंंठे जमीन लुटण्याचा प्रयत्न केला. ही बाब महसूल विभागाच्या निदर्शनास अनेक वेळा आणून दिली. मात्र, पनवेलच्या तहसीलदारांकडून दुर्लक्ष करण्यात आले.

अखेर पनवेलमधील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत आवाज उठविला. आणि शेकापचे नेते माजी आ. बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापचे जिल्हा शेतकरी सभा अध्यक्ष अनिल ढवळे यांच्यासह शेकापच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शुक्रवारी पनवेल तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढला. यावेळी सातबारा उताऱ्यावरील कमी झालेली जमीन पुर्ववत करून शेतकऱ्याचा सातबारा बनविण्यात यावा. तसेच, तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठी, यांनी चुकीच्या पद्धतीने बनविलेला सातबारा रद्द करावा. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या दुर्लक्षपणामुळे पांडूरंग पाटील हे शेतकरी गेली तीस वर्षे पिकांपासून वंचित राहिले आहेत. त्यांच्यावर झालेला अन्याय तात्काळ दुर करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ढवळे यांनी दिला.

Exit mobile version