शेकापची आंग्रेनगरातील पूरग्रस्तांना मदत

नालेसफाई करून पाण्याचा निचरा सुरू

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंडा येथील आंग्रेनगर परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती मिळताच शेतकरी कामगार पक्षाचे उपसरपंच संतोष (बाबू) मोरे, सरपंच प्रफुल्ल मोरे आणि शेकापचे शहर चिटणीस निलेश खोत यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. ग्रामस्थांना तातडीची मदत, जेवणाची व्यवस्था आणि जेसीबीच्या साहाय्याने नालेसफाई करून पाण्याचा निचरा करण्याची उपाययोजना करण्यात आली. यावेळी पावसाळ्यापूर्वी नाले व गटारांची योग्य साफसफाई झाली असती, तर ही परिस्थिती टाळता आली असती, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.

परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन जेसीबीच्या साहाय्याने नाल्यांची तातडीने साफसफाई करण्यात आली. तसेच पाण्याच्या प्रवाहात अडथळा ठरत असलेले गाळ व घाणीचे ढीग हटवून पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. या उपाययोजनांनंतर साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली. दरम्यान, पूरग्रस्त विजय पडवळ, माया पडवळ, नाना पडवळ, दीपक झावरे आणि सुरेश पाटील यांच्या कुटुंबांना शेकापच्या माध्यमातून तातडीने जेवणाचे डबे घरपोच देण्यात आले. तसेच, घराचे मोठे नुकसान झालेल्या सुरेश पाटील यांना उपसरपंच संतोष (बाबू) मोरे यांनी तत्काळ दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

मात्र, ही परिस्थिती टाळता आली असती, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली. पावसाळ्यापूर्वी एप्रिल किंवा मे महिन्यात नाले, गटारे आणि पाण्याच्या निचऱ्याच्या मार्गांची साफसफाई व नियोजन झाले असते, तर घरांमध्ये पाणी शिरण्याची वेळ आली नसती, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच, कै. शंकर पाटील यांच्या शेतातील भरावामुळे पाण्याचा नैसर्गिक निचऱ्याचा मार्ग बंद झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Exit mobile version