रेवदंड्यातील निलेश खोत यांची तात्काळ मदत
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे आंग्रेनगर येथील रवींद्र चेवले, मिलिंद भोईर आणि सुरेश झावरे यांच्या घरात रात्री 11 वाजता पाणी घुसले. याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे रेवदंडा शहर चिटणीस निलेश खोत यांनी अत्यंत तत्परतेने मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच निलेश खोत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सलीम गोंडेकर व प्रमोद बाळू नवखारकर घटनास्थळी रात्रीच उपस्थिती लावली. पाण्यामुळे त्रस्त झालेल्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि मानसिक आधार दिला. सकाळीही त्यांनी पुन्हा तिथे जाऊन पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला.
निलेश खोत यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीने वेळेवर नालेसफाई केली असती, तर ही परिस्थिती ओढवली नसती. नागरिकांची वित्तहानी व मानसिक त्रास टळला असता. त्यांनी ग्रामपंचायतीला निवेदन देऊन तातडीने नालेसफाईसह आवश्यक कामे हाती घेण्याची मागणी केली आहे. आधीच ग्रामसभेत शेकापचे माजी सदस्य संदीप खोत यांनी 15 दिवसांपूर्वी नालेसफाईचे महत्त्व अधोरेखित केले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे आता स्पष्ट होते. मारुती आळी येथील अनधिकृत शौचालय आणि मातीच्या बंधाऱ्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने संपूर्ण आंग्रे नगर परिसर जलमय झाला. शेतकरी कामगार पक्ष नेहमीच जनतेच्या पाठीशी उभा आहे आणि राहील. प्रशासन अपयशी ठरले, तरी आम्ही नागरिकांसोबत आहोत, असा ठाम शब्द निलेश खोत यांनी दिला.