रश्मिता पोपेटाच्या आमरण उपोषणाला नवे बळ; बाळाराम पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या रश्मिता पोपेटा यांच्या आमरण उपोषणाला आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठा पाठिंबा मिळू लागला आहे. शेतकरी कामगार पक्षाने या आंदोलनाला समर्थन दिले आहे. त्यामुळे दि.बा. पाटील नावाच्या लढ्याला नवे बळ मिळाले आहे. शेकापचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार बाळाराम पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून, सरकारने याप्रश्नी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित असल्याने दिबा समर्थकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सोमटणे येथील रिल्स स्टार रश्मिता पोपेटा यांनी चिंचपाडा येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसापासूनच विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि दि.बा. पाटीलप्रेमींनी उपोषणस्थळी गर्दी करण्यास सुरुवात केली असून, आंदोलनाला सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे.
उपोषणस्थळी भेट देताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी भाजपवर टीका करत, समाजाच्या भावनांशी प्रामाणिक राहण्याची वेळ आली आहे. लोकप्रतिनिधींनी केवळ सत्तेच्या दबावाखाली न राहता समाजाच्या न्याय्य मागणीसाठी उभे राहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी रश्मिता पोपेटा यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन केले.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी बाळाराम पाटील यांच्याशी संपर्क साधून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. आंदोलन अधिक तीव्र होण्यापूर्वी शासन स्तरावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यानंतर शेकाप नेते अतुल म्हात्रे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास फडके, शेकाप नेते राजेश केणी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
दि. बा. पाटील यांच्या नावाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रायगड जिल्हा शाखेनेही जाहीर पाठिंबा दिला आहे. जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, ज्येष्ठ नेते केसरीनाथ पाटील, उपाध्यक्ष अतुल चव्हाण, शहराध्यक्ष सुजित सोनवणे यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंब्याचे लेखी पत्र सादर केले. दरम्यान, लोकनेते दि.बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन रश्मिता पोपेटा यांची विचारपूस केली. मात्र, या भेटीनंतरही आंदोलनकर्त्यांमधील काहींनी नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले.
‘आये आयलू'च्या घोषणांनी दादूसने रंगवले वातावरण
लोकगीतांचा लोकप्रिय गायक संतोष दादूस उर्फ संतोष चौधरी यांनीही उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला. “आये आयलू“च्या घोषणांनी आणि आगरी बोलीतील गीतांनी त्यांनी आंदोलनस्थळावरील वातावरण भारावून टाकले. त्यांच्यासोबत मुंबईतील अनेक कलाकारही उपस्थित होते. दिवसभर गंभीर आणि चिंतेचे वातावरण असताना दादूस यांच्या उपस्थितीने आंदोलनकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले. सुमारे अर्धा तास त्यांनी सादर केलेल्या गीतांमुळे आंदोलनस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
समाज बांधवांचा वाढता सहभाग
उपोषणस्थळी शेकापचे खजिनदार अतुल म्हात्रे, आम आदमी पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष संतोष भगत, युवा नेते राजेश जुईकर, समाजसेवक निशांत भोईर, निशांत भगत तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी ठाण मांडून आहेत. सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून आंदोलनाला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले.
प्रकृतीबाबत चिंता वाढली
आमरण उपोषणामुळे रश्मिता पोपेटा यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी त्यांची आरोग्य तपासणी केली. आंदोलनाचा कालावधी वाढत असल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
