। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
कोळी बांधव हे अलिबाग-मुरूड आणि रोहा मतदार संघातील आण बान आणि शान आहेत. त्यांना अपशब्द वापरणे म्हणजे असंस्कृतपणाची लक्षणे आहेत. कोळी बांधवांवर आज दडपशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, दडपशाही तोच करतो जो घाबरलेला असतो. आणि आ. दळवींचीदेखील तीच अवस्था आहे. परंतु, कोळी बांधवांना घाबरायचे काहीच कारण नाही. कारण, त्यांच्या पाठीशी शेकापसह महाविकास आघाडी ठामपणे उभी असल्याचे वक्तव्य महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी केले आहे.
अलिबाग तालुक्यातील आक्षी ग्रामपंचायत हद्दीतील प्रचार दौर्यादरम्यान गुरूवारी (दि.14) साईनगर येथे झालेल्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई म्हणाल्या की, आज जे राज्यात चालू आहे, ज्या पद्धतीने राजकारण चिखलात लोळत आहे, यावर मात करण्यासाठी आणि विकास कामे करण्यासाठी शेकाप, काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) हे सर्व पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. भविष्यात होणार्या मुंबईची समस्या सोडवायची असेल तर या मतदार संघाला सुशिक्षीत उमेदवाराची गरज आहे. कारण तो विधानसभेत बोलू शकतो, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
पुढे त्यांनी सांगितले, मागील पाच वर्षात ज्यांना निवडून दिले, त्यांनी आमदार म्हणून विधान भवनात एकही प्रश्न मांडला नाही. वादळात येथील सुपारींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यांना पाहिजे तशी नुकसान भरपाई मिळाली नाही. याला कारण राज्यातील निष्क्रीय राजकारण हेच आहे. यावेळी महाराष्ट्रातील काही राज्यकर्ते पक्ष आणि घरे फोडण्यात तसेच गुवाहाटीला जाण्यात व्यस्त होते. यामुळे त्यांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडून सोडविण्यासाळी वेळच मिळाला नाही. दुःख या गोष्टीचे आहे की, दिवसा उजेडी या महाराष्ट्रात चोरी होते. काही मुठभर आमदार येऊन महाराष्ट्राची तिजोरी उघडतात आणि 50-50 खोके घेऊन गुवाहाटीला जातात. महाराष्ट्रातील कारखाने गुजरातला जातात ही चिंतेची बाब आहे.
आमदारांनी कोळी बांधवासाठी अपशब्द वापरले होते. लोक प्रतिनिधींनी कोणाच्याही जातीवरून बोलणे ही अलिबाग तालुक्याची संस्कृती नाही. याचा स्विकार सर्वसामान्य जनता अजिबात करणार नाही. कोणी कोणाच्या पोटावर पाय मारत असेल तर ते चुकीचे आहे. कारण हा त्याचा व्यवसाय आहे, त्याने कमवले पाहिजे. कारण या कमाईवर त्यांचे घर चालते आणि मुलांना शिक्षण दिले जाते. आमदारांनी त्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्यावर दडपशाही आणत आहेत. आणि दडपशाही तोच करतो जो घाबरतो. विद्यमान आमदारांचे देखील तेच झाले आहे. यामुळे जनता या चोरांवर प्रचंड नाराज आहे, अशी टीका करत चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी दळवी यांचा जाहीर निषेध केला. त्या म्हणाल्या की, कोळी बांधवांना माझा शब्द आहे की, मी निवडून आले तर तुम्हाला माझी दहशत वाटणार नाही. यामुळे 20 तारखेला मतदान करताना या सर्वांचा विचार करून मतदान करण्याचे आवाहन चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी केले. यावेळी शेकापचे जेष्ठ कार्यकर्ते द्वारकानाथ नाईक, अॅड. गौतम पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, प्रियदर्शनी पाटील, आश्लेषा नाईक, आक्षीच्या सरपंच रश्मी पाटील, उपसरपंच आनंद बुरांडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख शंकर गुरव, ग्रामपंचायत सदस्य, शेकापसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.