शेतकरी कामगार पक्षाचे जलसमाधी आंदोलन

Oplus_131072

| पनवेल | प्रतिनिधी |

साई येथील 108 गुंठे जमीन ही तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी बनावट कागदपत्र व सावकार उभे करून हडप केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाने कासारभट येथील भोंडकर कुटुंबीयांसह शुक्रवारी (दि.19) जलसमाधी आंदोलन पुकारले होते. यावेळी तहसीलदार व स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यांनी या जमीन मिळकतीच्या संदर्भातील सर्व अधिकार व अभिलेखाची पडताळणी करण्यात यावी, कर्नाळा मंडळाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले असल्याचे सांगितले.

पनवेल तालुक्यातील कासारभट येथील शेतकऱ्याला न्याय मिळत नसल्याने त्यांनी 8 ऑगस्ट रोजी अपर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर शुक्रवारी वडाळे तलावाजवळ जलसमाधी आंदोलन करण्याचे ठरवले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जलसमाधी आंदोलन पुकारण्यासाठी भोंडकर कुटुंबीय आले होते. त्यावेळी त्यांना तहसीलदारांसोबत चर्चा करण्यासाठी निरोप आला. त्यानंतर स्थानिक पोलीस, भोंडकर कुटुंबीय, माजी सरपंच अनिल ढवळे यांच्यासह आंदोलनकर्ते तहसील कार्यालयात गेले. त्यावेळी कर्नाळा मंडळ अधिकारी यांना, या प्रकरणाची पडताळणी करण्यात यावी, वेळोवेळी निर्गमित झालेल्या आदेशांच्या प्रति प्राप्त करून घेऊन आदेशांच्या अनुषंगाने पुढील कोणती कार्यवाही केली, याबाबत माहिती देण्यात यावी, तसेच याप्रकरणी कसूर झाला आहे का? आणि कसे व कोणाकडून, याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे पत्र पनवेलचे अपर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्याकडून देण्यात आले आहे. याबाबतचे पत्र मिळाल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष आणि भोंडकर कुटुंबीयांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतले आणि तत्कालीन तलाठी व मंडळाधिकारी यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली.

Exit mobile version