शेकापच्या वर्धापन दिनाकरिता कार्यकर्ते सज्ज
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचा 79 वा वर्धापन दिन रविवारी (दि.2) मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या विराट मेळाव्यात खालापूरमध्ये लाल वादळ केवळ गर्जणार नाही, तर शेकापची संघटनात्मक ताकदही दाखवणार आहे. शेकापच्या इतिहासातील आणखी एका पर्वाचे साक्षीदार होण्यासाठी खालापूर सज्ज झाले आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे महामार्गालगत असलेल्या मैदानात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भव्य मेळावा आयोजित केला आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात असून राज्यातील दिग्गज नेत्यांसह जवळपास 15 हजारहून अधिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. शेकापच्या वर्धापन दिनाचा मेळावा हा पक्षाच्या संघटनशक्तीचा मोठा अविष्कार ठरणार असल्याची माहिती शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिली.
शेकाप सरचिटणीस मा. आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार, आ. सत्यजीत तांबे, आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी माजी आ. बाळाराम पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकनाथ नाईक, प्रा. एस.व्ही. जाधव, शेकाप कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, खजिनदार अतुल म्हात्रे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप कामगार आघाडी प्रमुख प्रदिप नाईक, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम, शेकाप नेते संतोष जंगम, पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा ॲड. साम्या कोरडे वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
खालापूरमध्ये होणाऱ्या 79 व्या वर्धापन दिनाची तयारी गेल्या महिन्याभरापासून सुरु आहे. खालापूरमध्ये होणाऱ्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यासाठी शेकापने महिनाभरापासून जिल्हाभरात व्यापक जनसंपर्क मोहीम राबवली. तालुकानिहाय बैठका, गावभेटी आणि कार्यकर्ता संवादाच्या माध्यमातून मेळाव्याची तयारी करण्यात आली. त्याला महिला, तरुण आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिनाभराच्या नियोजनानंतर आता खालापूर लाल वादळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. गावागावांत पोहोचलेल्या शेकापच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लाल झेंड्यांनी सजलेले रस्ते, उभारलेले भव्य मंडप आणि जय्यत व्यवस्थेमुळे खालापूरमध्ये वर्धापन दिनाचा माहोल रंगला आहे. खालापूर परिसरात नाक्यानाक्यांवर लाल बावटे, स्वागत कमानी आणि फलक झळकू लागले असून संपूर्ण परिसर शेकापमय झाला आहे. मंडप, आसनव्यवस्था, पार्किंग, वाहतूक नियोजन तसेच इतर सर्व आवश्यक सुविधांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणारा हा मेळावा पक्षाच्या संघटनशक्तीचे दर्शन घडविणारा ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने विराट मेळाव्यात उपस्थित राहावे, असे आवाहन शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.
साम्या कोरडे यांच्या हस्ते झेंडावंदन
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पक्षाच्या ध्वजाचे झेंडावंदन केले जाणार आहे. झेंडावंदनाचा कार्यक्रम शेकाप पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा ॲड. साम्या कोरडे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिली.
