चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांना मतदारांकडून वाढता प्रतिसाद
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग, मुरूड व रोहा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. खारेपाटातील कुर्डूस व अन्य भागात शेकापच्या प्रचाराचा झंझावात दिसून येत असून, मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामध्ये महिला, तरुण व ज्येष्ठ मतदारांचा समावेश असल्याचे चित्र आहे. चित्रलेखा पाटील यांचे ठिकठिकाणी मतदारांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.
अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांना शेकापकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. गुरवारी (दि.24) ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर त्यांनी गावे, वाड्यांमधील प्रमुख कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला, तरुण मंडळी यांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. पक्षाची ध्येयधोरणे, गोरगरीब, सामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून पक्षाने कशा पद्धतीने काम केले आहे, याची माहिती मतदारांपर्यंत रुजविण्याचे काम केले जात आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांनी केलेले लढे व संघर्षामुळे सर्वसामान्यांना कसा न्याय मिळाला, याची माहितीदेखील देण्यात येत आहे. दरम्यान, तोच वारसा पुढे नेण्यासाठी आमदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी रविवारी (दि.27) त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली. सांबरी येथील दत्त मंदिरात जाऊन तेथील देवाचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढविला. त्यानंतर सांबरी गावात जाऊन येथील अनेक कार्यकर्ते व मतदारांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, अलिबाग पंचायत समितीच्या माजी सभापती विद्या म्हात्रे, बाळूशेट पाटील, विलास म्हात्रे, अनिल पाटील, प्रकाश पाटील, कलेंद्र पाटील, भगवान पाटील, अशोक पाटील, संजीव पाटील, सुरेंद्र पाटील, आवेटी रामदासवाडीमधील सुनील म्हात्रे, संतोष म्हात्रे, सतीश म्हात्रे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण, तरुणी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. चिऊताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो, लाल बावटे की जय अशा अनेक घोषणा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर आवेटी, रामदासवाडी, कुर्डूस, बिडवागळे या ठिकाणीदेखील त्यांनी प्रचार दौरा केला. दुपारी उन्हाचे चटके लागत असतानादेखील कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने, स्वयंस्फूर्तीने या प्रचारात सहभागी झाले होते. एक वेगळा आनंद व उत्साह कार्यकर्त्यांच्या चेहर्यावर दिसून येत होता. दुचाकीसह चारचाकी गाड्यांचा ताफा शेकडो कार्यकर्ते चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्यासोबत प्रचारात सहभागी झाले हाते.