घटनेची सखोल चौकशी करण्याची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
कुसुंबळे येथील सामाजिक कार्यकर्ते हेमंत खरसांबळे यांच्यावर गावगुंडांनी जीवघेणा हल्ला केला. परंतु, मारेकर्यांविरोधात ठोस कारवाई करण्यास पोलीस अपयशी ठरले असून, शिंदे गटातील राजा केणी यांच्या सांगण्यावरून हल्ला केल्याची माहिती देऊनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप खरसांबळे यांनी केला आहे. अखेर त्यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन घटनेची सखोल चौकशी करून मारेकर्यांचे फोन कॉल तपासण्यात यावेत, अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
कुसुंबळेतील हेमंत खरसांबळे यांच्यावर मंगळवारी (दि.8) रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यांच्यावर हॉकी स्टीकने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. शिंदे गटातील राजा केणी यांच्या सांगण्यावरून हा हल्ला केल्याचा आरोप खरसांबळे यांनी केला होता. ही घटना घडून 12 तास उलटून गेले होते. तरीदेखील पोलिसांनी मारेकर्यांविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. यातील मुख्य सूत्रधार राजा केणी आहे, असे सांगूनही पोलिसांनी त्याची पंचनाम्यात नोंद घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप खरसांबळे यांनी केला आहे. खरसांबळे यांच्यावर अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईतील दवाखान्यात पाठविण्यात आले होते. आता ते उपचार करून घरी आले आहेत. मात्र, ही घटना घडून पंधराहून अधिक दिवस उलटून गेले आहेत. परंतु, अद्यापपर्यंत पोलिसांकडून न्याय मिळाला नसल्याची खंत खरसांबळे यांनी व्यक्त केली आहे. रात्रीच्यावेळी झालेल्या हल्ल्याची दखल पोलिसांनी घेतली नसल्याने पोयनाड पोलिसांच्या या भूमिकेबाबत खरसांबळे यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
पंधरा दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी जीवघेणा हल्ला करण्यात आला. अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी 12 तासांनंतर येऊन घटनेची माहिती घेऊन पंचनामा, जबाब लिहून घेतला. राजा केणी या हल्ल्यामागील सूत्रधार आहे, असे सांगूनही पोलिसांनी त्यांचे नाव टाकू शकत नाही. असे सांगून टाळाटाळ केली.
हेमंत खरसांबळे,
पीडित
मंगळवारी (दि.8) रात्री झालेल्या हल्लेखोराविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चौघांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. खरसांबळे यांच्या पंचनामा व जबाबात राजा केणी यांचा उल्लेख नसल्याने त्यांचे नाव टाकण्यात आले नाही. त्यांनी जिल्हा रुग्णालयात जो जबाब दिला. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्यांना दोन दिवसांपूर्वी अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
संतोष दराडे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोयनाड