मविआकडे अनिकेत देशमुखांच्या उमेदवारीची मागणी
| मुंबई | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षानं महाविकास आघाडीकडं माढाच्या जागेवर दावा केला आहे. या मतदारसंघातून गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना खासदारकीची उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

शरद पवारांच्या भेटीनंतर जयंत पाटील म्हणाले, माढा मतदारसंघात मी गेलो होतो, तिथल्या जागेवर आमच्या शेकापनं दावा केला आहे. या ठिकाणी गणपतराव देशमुखांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांच्या उमेदवारीची मागणी आम्ही केली आहे. काल मी माढ्यातील काही प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा केली, त्यानंतर महाविकास आघाडीसमोर आमची मागणी ठेवली आहे. पहिल्यापासून आमचा हा आग्रह आहे की, जागेपेक्षा महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणं महत्त्वाचं आहे. यासाठी आमचं थोडंफार नुकसान झालं किंवा एखादी जागा मिळाली नाही तरी चालेल.
पण महाविकास आघाडी एकत्र येऊन महाराष्ट्रात सध्या जे वातावरण तयार झालं आहे त्याला तडा जाऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे. अनिकेत देशमुख हे डॉक्टर आहेत, विशेषतः त्यांची प्रतिमा चांगली आहे. विधानसभेला ते केवळ 400 मतांनी पडले होते. त्यांच्यामागे गणपतराव देशमुखांचं नाव आहे. आमची जवळपास दीड लाख मतं माढा मतदारसंघात आहेत. पण, यावर एकमत झालं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतो आहे. जरी आमच्या बाजूनं निर्णय झाला नाही, तरी मी महाविकास आघाडीसोबत आणि इंडिया आघाडीसोबत राहणार आहोत. महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा महाराष्ट्रात गेल्या खेपेला आमचं नुकसान झालं. आमच्या उमेदवारांचा विश्वासघात केला गेला. ते लोक आता सोडून गेलेले आहेत, त्यामुळं आमची मविआकडं तक्रार नाही.







