शरद पवार राहणार उपस्थित
| पंढरपूर | प्रतिनिधी |
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे 19 वे अधिवेशन शुक्रवारी (दि. 2) व शनिवारी (दि. 3) पंढरपूर येथील विठ्ठल रखुमाई पॅलेस येथे भाई डॉ. गणपतराव देशमुख नगरीत संपन्न होणार असल्याची माहिती अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली. या अधिवेशनास शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, उद्घाटन मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे सरचिटणीस कॉम्रेड दीपाशंकर भट्टाचार्य यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी संपतराव पवार-पाटील असणार आहेत.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवार (दि. 2) रोजी खुले सत्र होणार असून, दुपारी दोन वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांती ज्योती मशालीचे प्रज्ज्वलन करण्यात येणार आहे. अधिवेशनाचे अध्यक्ष संपत पवार-पाटील यांच्या हस्ते लाल ध्वजाला सलामी देण्यात येईल. स्वागताध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख आपले विचार व्यक्त करणार आहेत. तसेच दुपारी तीन वाजता पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील हे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करुन देतील. दीपाशंकर भट्टाचार्य उद्घाटनीय विचार व्यक्त करतील. तसेच दुपारी सव्वाचार वाजता शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी उदय नारकर, ॲड. सुभाष लांडे, भीमराव बनसोड, किशोर ढमाले, साथी प्रताप होगाडे आपले विचार व्यक्त करतील. सायंकाळी साडेपाच वाजता शेतकरी कामगार पक्षाचे प्रा. एस.व्ही. जाधव हे राजकीय ठराव मांडणार आहेत.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार (दि. 3) रोजी सकाळी नऊ वाजता थोर विचारवंत माननीय कराळे यांचे ‘संविधान’ या विषयावरती व्याख्यान होणार आहे. तसेच सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत राजकीय ठरावावरती चर्चा होईल. दुपारी अध्यक्षीय मंडळाच्या सहमतीने पक्षाचे पदाधिकारी, सरचिटणीस व चिटणीस मंडळ, मध्यवर्ती समिती अशा विविध पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण निवडी करण्यात येणार आहेत. शेवटी पक्षाचे नवनिर्वाचित सरचिटणीस अधिवेशनाच्या समारोपाचे भाषण करतील व अधिवेशनाची सांगता होईल.
या अधिवेशनात पक्षाचे व पुरोगामी युवक संघटनेचे राज्यभरातून जे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते येणार आहेत, त्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी, या अधिवेशनास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
रायगडातून हजारो कार्यकर्ते जाणार
अलिबाग: रायगड जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी होणार आहे. अधिवेशनाला जाण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या अधिवेशनाला शेकापचे नेते माजी आ. जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अधिवेशनात सहभागी होण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. अधिवेशनामध्ये पक्षश्रेष्ठींकडून मोलाचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना मिळणार आहे. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी या अधिवेशनात सहभागी व्हावे, असे आवाहन शेकापच्यावतीने करण्यात आले आहे.