शेकापचा जिल्हा दौरा उद्यापासून सुरू होणार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांचा रायगड जिल्हाचा दौरा शनिवारपासून (दि. 8) सुरू होणार आहे. पुढील चार दिवस म्हणजेच मंगळवारपर्यंत (दि.11) हा दौरा असणार आहे. या दौर्‍याची सुरुवात उरण तालुक्यातून होणार असून, समारोप अलिबागमधून होणार असल्याची माहिती जिल्हा चिटणीस मंडळाकडून देण्यात आली आहे.

या संवाद मेळाव्यादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, चिल्हा चिटणीस सुरेश खैरे, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, राजिप माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, खजिनदार प्रीतम म्हात्रे, रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील उपस्थित राहणार आहेत.

नुकतीच सुरेश खैरे यांची शेकापचे जिल्हा चिटणीस म्हणून निवड झाली आहे. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी दौर्‍याचे नियोजन केले आहे. शनिवारी (दि. 8) उरणमधील वासुदेव बळवंत फडके सभागृहात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कार्यकर्त्यांसमवेत ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक हॉल, सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कर्जतमधील नेरळ येथील ऋषभ गार्डन, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खालापूर तालुक्यातील खोपोली येथील समर्थ कृपा मंगल कार्यालयात बैठक होणार आहे.

दुसर्‍या दिवशी रविवारी (दि. 9) पेणमधील सार्वजनिक विद्यामंदिर येथे सकाळी दहा वाजता ही बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुधागड तालुक्यातील नंदगाव संत नामदेव माध्यमिक विद्यालय, सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास रोहामधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहातील सभागृहात, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुरूडमधील उसरोली येथील आगरी समाज हॉल येथे कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे.
सोमवारी (दि.10) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पोलादपूरमधील मोरगिरी, महाडमधील नवेनगर येथील कुणबी भवन येथे दुपारी साडेबारा वाजता बैठक होणार आहे. तसेच म्हसळा येथील कुणबी भवनमध्ये दुपारी दोन वाजता, श्रीवर्धनमधील दिवेआगर येथील कोळी समाज हॉल येथे सायंकाळी चार वाजता आणि माणगावमधील मोर्बा हायस्कूलमध्ये सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बैठक होणार आहे. शेवटचा दौरा मंगळवारी (दि.11) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अलिबागमधील पीएनपी नाट्यगृह येथे कार्यकर्त्यांसमवेत संवाद साधला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version