। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याचाच एक भाग आणि आगामी 2 ऑगस्टला होणार्या शेकाप वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांची विचारविनिमय सभा सुधागड तालुक्यात आयोजित करण्यात आली होती. युती वा आघाडी कोणाशी होणार याचा फार विचार न करता स्वबळावर लढायची तयारी कार्यकर्त्यांनी करावी, असे आवाहन शेकाप नेते सुरेश खैरे यांनी या बैठकीतून केले आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या 2 ऑगस्टला होणार्या वर्धापनदिनाच्या नियोजनाबाबत पाच्छापूर, नांदगाव, गोमाशी, नेनवली, नागशेत, आतोने ग्रामपंचायतीमधील कार्यकर्त्यांची विचारविनिमय सभा माजी जि.प. सदस्य सुरेश खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. नामदेवशेठ खैरे सभागृह नांदगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती गणाच्या विभागणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच ऑक्टोबर महिन्यात होणार्या पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असे सांगण्यात आले. तसेच आपण कोणत्या पक्षासोबत युती, आघाड्या करायच्या हे अजून ठरलेले नाही. पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्यानुसार आपल्याला कळविण्यात येईल. सध्या तरी आपल्याला स्वबळावर येणार्या निवडणुका लढवायच्या आहोत, असे समजून तयारीला लागा, असेही खैरे यांनी सागितले.
आपल्या पक्षातील कार्यकर्ते कोणी अजूनपर्यंत कोणत्या पक्षात इकडे तिकडे गेला नाही, असा दावाही त्यांनी केला. कोरोनाच्या पाश्वर्र्भूमीवर शेकापक्षाचा वर्धापनदिन प्रत्येक तालुक्यामध्ये साध्या पद्धतीने साजरा केला. मात्र यावर्षी 2 ऑगस्टला वडखळ येथे होणार्या वर्धापनदिनाची तयारी म्हणून आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. 2 ऑगस्ट रोजी होणार्या वर्धापनदिनाच्या नियोजनासाठी रविवारी 17 जुलैला गुजराती हॉल पाली येथे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत सायंकाळी 4 वाजता विचार विनिमय सभा आयोजित करण्यात आली आहे. तरी या सभेला आपण उपस्थित रहावे, असे जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
या सभेसाठी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, सुधागड शेकाप चिटणीस उत्तमराव देशमुख, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन किसन उमटे तसेच नांदगाव, गोमाशी, नेनवली, नागशेत, आतोने,पाच्छापूर ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच सदस्य आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.