आ. जयंत पाटील कडाडले, पालीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये आणली जाण
| स्व. नामदेवशेठ खैरेनगरी | प्रमोद जाधव |
ज्यांना ज्यांना मोठे केले, ज्यांना ज्यांना सत्तेची पदे दिली, एवढे देऊनही ज्यांनी ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, जनतेचा विश्वासघात केला, अशा गद्दारांचा बदला घेण्याचा गर्भित इशारा शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी पाली येथील शेकाप मेळाव्यात दिला. शेकापच्या वर्धापनदिन मेळाव्यात बोलताना आ. जयंत पाटील यांनी आपल्या तडाखेबंद, अभ्यासपूर्ण भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये जाण आणली. पक्षाने आतापर्यंत अनेकांना मोठे केले, अनेकांना पाठिंबा देऊन लोकसभेत पाठविले, सत्तेची पदे उपभोगायला दिली, त्यांनीच पक्षाशी गद्दारी केली, हे कुणालाच रुचलेले नाही. याचा आता आपल्याला बदला घ्यायचा आहे. 2024 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत या गद्दारांना त्यांची योग्य ती जागा दाखविण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती, बदलते राजकीय प्रवाह, शेकापचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचा गौरवशाली इतिहास, महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य, सत्यशोधक समाजाची वाटचाल आदींवर परखड मत मांडले.
भाजपचा पराभव हेच लक्ष्य
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे, हेच आता विरोधी पक्षांचे मुख्य लक्ष्य आहे. यासाठी सर्वांनी एकजूट बांधली आहे. विविध राजकीय विचारसरणीचे पक्ष आता मतभेद असतानाही केवळ भाजपचा पराभव केलाच पाहिजे या एकाच भूमिकेतून एकत्र आलेली आहेत, असे ते म्हणाले.जर 2024 मध्ये भाजपचा पराभव झाला नाही, तर त्याचे मोठे दुष्परिणाम देशाला भोगावे लागतील आणि ते देशाची राज्यघटनाच बदलून टाकलील, असा गर्भित इशाराही जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून दिला.
प्रागतिक आघाडी ‘मविआ’समवेत
राज्यात बदलत्या राजकीय परिस्थितीत आम्ही प्रागतिक पक्ष महाविकास आघाडीसमवेत राहणार असल्याचेही जयंत पाटील यांनी जाहीर केले. आज महाविकास आघाडी नव्याने स्थापन झालेल्या ‘इंडिया’मध्ये सहभागी आहे. याचाच अर्थ, शेकापसहित प्रागतिक आघाडीसुद्धा ‘इंडिया’मध्ये सहभागी असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
उद्धव ठाकरेंना पाठिंबा
शिवसेनेतील फुटीवरुनही आ. जयंत पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना सत्तेची पदे देऊन मोठे केले, त्यांनीच पक्षाशी केलेली गद्दारी ही महाराष्ट्राला पटलेली नाही.त्यामुळेच आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे, त्यांना सहानुभूती मिळत असून, त्याचे प्रत्यंतर येणाऱ्या निवडणुकांमध्ये निश्चित दिसून येईल, असेही जयंत पाटील म्हणाले.
तोपर्यंत शेकापचे अस्तित्व राहणारच
त्यांनी पक्षातून जे सोडून गेले, त्यांच्यावर जोरदार प्रहार केले. कुणी आले, कुणी गेले याची पर्वा शेकापने कधीही केली नाही अथवा करणार नाही. जोपर्यंत सर्वसामान्य, गोरगरीब जनता आमच्यासोबत आहे, तोपर्यंत शेकाप हा जिवंतच राहील, असेही त्यांनी टीकाकारांना निक्षून बजावले. सत्तेच्या हव्यासापोटी नेतेमंडळी शेकाप सोडून गेले, पण सर्वसामान्य कार्यकर्त्याने मोठ्या जिद्दीने, अभिमानाने लालबावटा फडकावित ठेवला आहे, असे ते म्हणाले. आज आमच्याविरोधात जे लढत आहेत, त्यांना शेकापनेच मोठे केले. त्यांना मोठे करण्यात आमचीच पापे कारणीभूत ठरली, असेही त्यांनी कबूल केले.
मराठा समाजाला आरक्षण हवेच!
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी जोरदार मागणीही जयंत पाटील यांनी यावेळी केली. समाजात आजही मराठा समाजात आर्थिक दुर्बल घटक आहेत. त्यांच्या उन्नतीसाठी 10 टक्के आरक्षण देण्याचा राज्यकर्त्यांनी गंभीरपणे विचार करावा, असे ते म्हणाले. यासाठी घटनेत बदल करा, ओबीसींचे आरक्षण आहे ते तसेच ठेवून आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांवरुन 70 टक्क्यांपर्यंत वाढवा, बहुमत असल्याने हे भाजपला शक्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
तुम्ही माझ्या हृदयात
तुम्ही माझ्या हृदयात कायमचे आहात, तसेच मी पण तुमच्या हृदयात कायम राहणार आहे, असे भावनिक आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. ते करताना आता मात्र ज्यांनी ज्यांनी आपल्याशी गद्दारी केली, त्यांचा बदला घ्यायची वेळ आलेली आहे. आता फक्त एकच निर्धार- फक्त बदला आणि बदला…असे त्यांनी जोशपूर्ण भाषणातून सांगताच उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘भाई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, लाल बावटे की जय’ असा जयघोष करीत सभागृह दणाणून सोडले.
…तर रायगड पेटवून देऊ
कुणी सोबत असो वा नसो, फक्त तुमची सोबत असेल तर येणाऱ्या निवडणुकीत रायगड पेटवून टाकून शेकापची ताकद काय आहे हे गद्दारांना दाखवून देऊ, असा खरमरीत इशाराही जयंत पाटील यांनी दिला.
इर्शाळवाडीवासियांना शेकापची मदत
इर्शाळवाडीवर झालेल्या दुर्घटनेचाही आ. जयंत पाटील यांनी उल्लेख केला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पण, तिथे सर्वोतोपरी मदत पुरविण्याचे काम शेकापने विशेष करुन जे.एम. म्हात्रे यांनी केले आहे. ती मदत करताना कुठल्याही प्रकारचा गवगवा त्यांनी केला नाही. दुर्घटना घडली त्यावेळी गुरुनाथ साठेलकर यांची इंजिनिअर झालेली मुलगी मदतीसाठी प्रथम पोहोचली होती. पण, तिनेही कधीही याची वाच्यता केली नाही अथवा कुठल्याही प्रसारमाध्यमांशी त्याची साधी दखलही घेतली नाही. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. संकटसमयी मदत करणे हे सारे शेकापचे संस्कार आहेत. अडचणीत सापडलेल्यांना मदत करण्याचा वसा आम्ही जपला असल्याचेही त्यांनी सूचित केले.
जनतेचा शेकापवरच विश्वास
आज आपले विधानसभेत आमदार नाहीत तरीही रायगडची जनता शेकापवर विश्वास ठेवून आहे. जिल्ह्यात आपली हक्काची साडेचार लाख मते आहेत. पनवेलमध्ये आपला पराभव होणार हे माहीत असूनही तेथील 80 हजार मतदारांनी केवळ पक्षाशी एकनिष्ठ राहून शेकापला मतदान केले. याचाच अर्थ, आजही मतदारांचा, जनतेचा शेकापवर विश्वास आहे. संकटसमयी याच पक्षाचा कार्यकर्ता आपल्या मदतीला धावून येतो, हे यामधून दिसते, असे ते म्हणाले.
राम ठाकूर कुणाला माहीत होते?
दत्ता पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाला. कधी नव्हे तो शेकाप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. त्यावेळी काकांनी मला सांगितले, जयंता, आता लोकसभा लढवायची नाही. पण, त्यानंतर अवघ्या सोळा महिन्यांतच शेकापने पुन्हा एकदा लोकसभा जिंकली. त्यावेळी राम ठाकूर कुणाला माहिती तरी होते का, पण त्यांना पक्षाने उमेदवारी देऊन निवडून आले. अंतुलेंसारख्या मातब्बर नेत्याचा पराभव शेकापने करुन दाखविला. त्यांच्याकडे तब्बल दीड लाख मुस्लिम मतदार असतानाही आम्ही जीवाची बाजी लावून, कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करुन पक्षाला पुन्हा एकदा विजय मिळवून दिला. एवढा विजय मिळवून देऊनही राम ठाकुरांनीही गद्दारीच केली. याची आठवणही जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून केली.
राजे, आता महाराष्ट्र पिंजून काढा
जयंत पाटील यांनी आपल्या दीड तासाच्या अभ्यासपूर्ण भाषणातून राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने द्रष्टे राज्यकर्ते होते. सामाजिक भान असणारा लोकनेता अशी त्यांची ओळख होती.ती आजही आपल्या कुटुंबियांनी जोपासली असल्याचे त्यांनी नमूद केले. सहकार चळवळ रुजवून वाढविण्यात, तसेच कामगार चळवळीला प्रोत्साहन देण्यात राजर्षींचा सिंहाचा वाटा होता. याचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणातून केला. सत्यशोधक समाजाची निर्मिती महात्मा फुले यांच्या विचारसरणीतून निर्माण झाली. त्या समाजाला जिवंत ठेवण्याचे काम शाहू महाराजांनी आपल्या कार्यकाळात केले. या सत्यशोधक समाजसरणीमधूनच शेकापचा जन्म झाला, हा इतिहास भावी पिढीला समजणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. संभाजीराजे आता तुमच्या नेतृत्वाखाली आम्हाला महाराष्ट्रात काम करायचे आहे. यासाठी तुम्ही अवघा राज्य पिंजून काढा, प्रसंगी शेतकरी कामगार पक्षाच्या वाट्याला येणारी विधानसभा अथवा लोकसभेच्या निवडणुकीची एखादी जागा द्यायलाही आम्ही मागे राहणार नाही, असेही जयंत पाटील यांनी जाहीर केले.प्रागतिक पक्षांची आघाडी आपल्या मागे ठामपणे उभी राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यानिमित्ताने दिली.
मी एकटा पुरेसा आहे
विधिमंडळात पक्षाचे अस्तित्व कमी आहे, हे वास्तव कुणीही नाकारु शकत नाही. पण, अस्तित्व कमी असले तरी मी एकटा साऱ्यांना पुरेसा आहे, असे जयंत पाटील म्हणाले. यासाठी त्यांनी विधिमंडळ अधिवेशनात विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंना अपात्र ठरविण्याबाबतच्या केलेल्या मागणीचा उल्लेख केला. आमच्यासारखी वेडी माणसे या विधिमंडळात आहेत म्हणून आम्ही छातीठोकपणे राज्यकर्त्यांना जाब विचारु शकतो. आमची बांधिलकी विचारांशी आहे. आतापर्यंत आम्ही पक्ष कधीही सोडला नाही, त्याचप्रमाणे विचारही कधी सोडले नाहीत, असेही त्यांनी निक्षून सांगितले. विधिमंडळात सभागृह कधीच बंद पाडायचे नसते, तर कायद्याच्या आधारे सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडून नामोहरम करायचे असते, याची शिकवण पक्षाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिल्याचे ते म्हणाले.