संभाजीराजे छत्रपती यांचे प्रशंसोद्गार
| स्व. नामदेवशेठ खैरेनगरी|
शेतकरी कामगार पक्षाच्या मंचावर मी आल्याचा संभ्रम साऱ्या महाराष्ट्राला आहे. शेकाप ज्या विचारांवर चालतो, ते विचार छत्रपती शिवराय, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेले आहेत. बहुजनांचे समाजहित आणि डाव्या विचारांचा पगडा असणारा पक्ष आहे. म्हणजेच, पुरोगामी विचार जेथे आहेत, तेथे आम्ही येणारच. गेले 75 वर्षांपासून शेकापने ही परंपरा कायम ठेवली आहे. संघर्ष आणि चळवळ हे एकमेव ध्येय असणारा हा पक्ष आजही राजकीय स्थित्यंतरानंतर आपले अस्तित्व टिकून आहे. हे विचार आगामी महाराष्ट्राला दिशा देणारे ठरणार आहेत, असे प्रतिपादन संभाजी राजे छत्रपती यांनी केले.
शेकाप मेळाव्यात बोलताना त्यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. राज्यातील सत्तेमध्ये शिवसेना, विरोधात शिवसेना, तसेच सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधातही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष मात्र याची मजा घेत बसले आहेत. राजकारणातील राजकीय विचार संपले आहेत. असे असताना प्रागतिक पक्षांना सोबत घेऊन लढा उभारण्याचा निर्धार आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. भारतीय संविधानाला न मानणारा वर्ग तरुणांना लक्ष करीत आहे. तिरंगा झेंड्याला मानत नाही, अशा विचारांना वेळीच ठेचण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचा आदर्श संपूर्ण जगाने घेतला आहे. असे असताना राजकीय वातावरणाने मात्र वेगळाच पायंडा पाडला आहे, असे मत संभाजी राजे छत्रपती यांनी व्यक्त केले. शेकाप कार्यकर्त्यांची निष्ठा, जिद्द आणि शिस्त वाखाणण्याजोशी आहे, असे प्रशंसोद्गारही त्यांनी काढले.
नारायण नागू पाटील यांनी रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सावकारी विरोधात आंदोलन केले होते. 1933 ते 1939 अशी सलग सात वर्षे हे आंदोलन सुरु होते. त्यांच्या मनामध्ये शेतकरी कामगार यांच्यासाठी तगमग होती, म्हणूनच त्यांनी आंदोलन उभारले होते, असेही त्यांनी सांगितले.
शेकाप वाकला नाही, झुकला नाही
शेकाप हा कधीच कोणासमोर वाकला नाही आणि झुकलादेखील नाही. तो आमदार पाटील यांच्या रुपाने ताठ मानेने कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्यासाठी उभा आहे. यासाठी त्यांनी एक किस्सा सांगितला. गणपतराव मोरे यांचे नातू विश्वासराव मोरे मला एकदा भेटले. त्यांनी मला मुजरा केला. तेव्हा मी त्यांना मुजरा करु नका, असे सांगितले. परंतु, मी तुम्हाला मुजरा करत नाही, तर शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या घराण्याला मुजरा करत असल्याचे सांगितले.
1917 साली बहिष्कृत समाजाचे अधिवेशन होते. त्या अधिवेशनाला शाहू महाराजांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, शाहू महाराज यांच्या कन्या राधाबाई या आजारी होत्या. त्यामुळे मी अधिवेशनाला येऊ शकणार नाही, असे पत्र त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पाठवले. अधिवेशनाला येणारे कामगार, शेतकरी ही तुमची मुलं नाहीत का, असे सवाल करणारे पत्र बाबासाहेब आंबेडकरांनी उलट टपाली शाहू महाराजांना पाठवले. विचार जिवंत राहिला पाहिजे हे महाराजांना उमगले होते. याच कारणांनी ते अधिवेशनाला गेल्याचे संभाजी राजांनी सांगितले. मी मूळचा राजकारणी नाही, परंतु राजकारणात एक सुसंस्कृपणा आणण्यासाठी आणि स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजांनी सांगितले.
मीनाक्षीताईंविषयी कृतज्ञता
संभाजी राजे यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभीच माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. एवढ्या मोठ्या दुर्धर आजारातही त्या अत्यंत धीराने उभ्या आहेत. शिवाय येथे आल्यापासून त्या माझी अत्यंत आपुलकीने विचारपूस करत आहेत, हे पाहून मन खरोखरच भरुन आले. राजे आपल्या कार्यक्रमाला आले. आमच्यासोबत बसले, याचा आनंद त्यांना झाला. त्यामुळे अगदी आपुलकीने त्या माझी सातत्याने चौकशी करीत होत्या. ते पाहून मन खरोखरच आनंदित झाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.