उलवेत पाण्यासाठी शेकापचा हंडा मोर्चा

| पनवेल | प्रतिनिधी |
उलवे नोडमध्ये होणार्‍या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले असून याबाबत शेकापने नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहचविण्यासाठी उलवे नोड शेकापतर्फे मुंबई कृषिउत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हंडा मोर्चा काढला. यावेळी उलवेमधील नागरिकांनी सिडकोला जाब विचारत आम्ही नियमित पाणी पट्टी भरतो, मग आम्हाला आमच्या हक्काचे पाणी का मिळत नाही?, आमच्या हक्काचे पाणी विकून सिडकोने बेकायदेशीर धंदे करणे बंद करावे, उलवे नोडमधील सर्व रहिवाशांना नियमित उच्च दाबाने पाणी मिळालेच पाहिजे अशी मागणी केली.

उलवे नोड हा सिडकोने विकसित केला. यामुळे या ठिकाणी मुंबई परिसरसतील नागरिक मोठ्या प्रमाणात राहण्यासाठी आले, सिडकोने या भागात रेल्वे सुरु केली. यामुळे येथील लोकसंख्या वाढली आणि नागरिकांना पाणी प्रश्‍न भेडसावू लागला. तेव्हा सिडकोने या ठिकाणी त्वरित पाण्याचा साठा वाढावावा असे शेकाप नेते व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र महादेव पाटील यांनी सांगितले. युवा नेते प्रशांत रमेश पाटील यांच्या माध्यमातून हा हंडा मोर्चा काढण्यात आला असून यावेळी मोठ्या प्रमाणात उलवेकर नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

Exit mobile version