| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात सुरु असलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला असल्याचे पक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. तसे पक्षाचे कार्यालयीन चिटणीस अॅड.राजू कोरडे यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे. विधान परिषदेच्या कोकण शिक्षक, अमरावती पदवीधर,नागपूर शिक्षक, औरंगाबाद शिक्षक, .नाशिक पदवीधर अशा पाच मतदारसंघात येत्या 30 जानेवारीला निवडणूक होत आहे. या पाचही मतदारसंघातील निवडणूक महाविकास आघाडीने एकजुटीने लढविण्याचा निर्धार केला आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघात बाळाराम पाटील (शेकाप), अमरावती पदवीधर मतदारसंघात धीरज लिंगाडे (काँग्रेस), नागपूर शिक्षक मतदारसंघात सुधाकर आडबाले (काँग्रेस), औरंगाबाद शिक्षक मतदार संघात वक्रम काळे (राष्ट्रवादी), आणि नाशिक पदवीधर मतदारसंघात रूपाली पाटील(शिवसेना), या महाविकास आघाडीच्या पाचही उमेदवारांना शेकापने पाठिंबा दिला असून या सवार्ंच्या विजयाकरिता शेका पक्षाचे कार्यकर्ते तसेच शिक्षक, पदवीधर, विद्यार्थी, युवक अशा सर्व आघाड्याांवरील कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शिकस्त करावी, असे निर्देश पक्षाचे सरचिटणीस आम जयंत पाटील यांनी दिले आहेत.
जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व शाळांना शंभर टक्के अनुदान द्या,तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करा या प्रमुख व यासम मागण्यांकरिता तसेच भारतीय संविधानाच्या रक्षणाकरिता धर्मांध आणि जात-जमातवादी विचारसरणीच्या पक्षांच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव करा! असे आवाहन जयंत पाटील यांनी संबंधित मतदारांना केले आहे.
विधानपरिषद निवडणुकीत शेकापचा मविआला पाठिंबा
