माणगाव कृउबा समितीवर शेकापचा लाल बावटा

१८ पैकी १२ संचालक बिनविरोध : तालुका चिटणीस मोरे
। माणगाव । वार्ताहर ।
संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकला असून १८ पैकी १२ संचालक शेकापचे बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना दिली. निवडून आलेल्या सर्व संचालकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या चार तालुक्यांची मिळून माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या समितीची निवडणूक येत्या ३० एप्रिल रोजी होत असून हि निवडणूक सर्वच प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. या समितीत एकूण १८ संचालक असून सोसायटीमधून ११ संचालक व ग्रामपंचायत मतदार संघातून ४ संचालक तर व्यापारातून २ संचालक असे एकूण १८ संचालक हे निवडून द्यायचे असतात.

त्यामध्ये सर्वसाधारण मतदार संघातून ७ संचालक, महिला प्रवर्गातून २ संचालक, विमुक्त भटक्या जमातीतून १ संचालक, ओबीसी १ संचालक असे एकूण ११ संचालक व हमाल माफाडी १ संचालक असे मिळून १२ संचालक शेकापचे बिनविरोध निवडून येऊन या समितीवर पुन्हा एकदा शेकापने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शेकापचे जेष्ठ नेते तथा सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली तसेच माणगाव तालुक्यातील मोर्बा येथील शेकापचे जेष्ठ नेते अस्लम राऊत व तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली शेकापने या निवडणुकीत भरभरून यश संपादन केले आहे.

यामध्ये नाझनीन अस्लम राऊत व गौरी भाऊ पैर (महिला वर्ग), सुषमा लीलाधर रिकामे (विमुक्त भटक्या जमाती), गिजे विनायक राऊत (ओबीसी), रमेश पांडुरंग मोरे, हसनमिया अ. लतीफ बंदरकर, कौस्तुभ विद्याधर धामणकर, नरेश लक्ष्मण दळवी, दिलीप विनायक उतेकर, महेश गजानन सुर्वे, अल्लाउद्दीन उमर सनगे ( सर्वसाधारण), स्वप्नील सीताराम दसवते( हमाल माताडी) हे १२ संचालक शेकापचे निवडून आले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version