| खांदेश्वर | प्रतिनिधी |
नोव्हेंबर महिन्याची चाहूल लागताच घाटमाथ्यावरील मेंढपाळ कुटुंबांनी आपल्या मेंढ्या आणि शेळ्यांच्या कळपांसह पनवेल तालुक्यात दाखल होण्यास सुरुवात केली आहे. बदलत्या काळात शेतीच्या पद्धती आधुनिक होत असल्या, तरी शेती आणि पशुपालन यांच्यातील पारंपरिक नाते आजही टिकून आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी भटकंती करणाऱ्या या मेंढपाळ कुटुंबांचा प्रवास अनेकांसाठी कुतूहलाचा, तर त्यांच्या जगण्याची कहाणी संवेदनशील करणारी आहे.
पनवेल तालुक्यात आजही अनेक शेतकरी भातशेतीसह विविध प्रकारची पिके घेतात. शेतीची कामे पूर्ण झाल्यानंतर शेतजमिनीला नैसर्गिक खत मिळावे, यासाठी शेतकरी मेंढपाळांना आपल्या शेतात काही दिवस मुक्काम करण्याची परवानगी देतात. मेंढपाळ आपल्या कुटुंबासह शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागेत तात्पुरता डेरा टाकतात. रात्रीच्या वेळी मेंढ्या आणि शेळ्या शेतात बसवल्या जातात. त्यांच्या विष्ठेमुळे जमिनीला नैसर्गिक खत मिळते. त्यामुळे जमिनीचा कस सुधारण्यास मदत होते. या पारंपरिक व्यवस्थेत शेतकरी आणि मेंढपाळ दोघांचाही फायदा होतो. मेंढपाळांच्या कळपामुळे शेताला नैसर्गिक खत मिळते, तर त्याबदल्यात शेतकऱ्यांकडून मेंढपाळ कुटुंबांना धान्य किंवा ठरावीक पैसे दिले जातात. अशा प्रकारे अनेक वर्षांपासून शेती आणि पशुपालन यांचा एकमेकांना पूरक असा व्यवहार सुरू आहे. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी परिसरातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूनेही सध्या मेंढपाळांचे कळप मार्गक्रमण करताना दिसत आहेत. एका बाजूला आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीमुळे परिसराचा चेहरामोहरा बदलत आहे, तर दुसऱ्या बाजूला डोक्यावर संसाराचे ओझे आणि सोबत मेंढ्या-शेळ्यांचा कळप घेऊन निघालेली ही कुटुंबे आजही आपल्या पारंपरिक जीवनशैलीशी जोडलेली आहेत. विकासाच्या वेगवान प्रवासात दिसणारे हे चित्र अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.







