सुप्रिया पाटील यांच्याकडून कोळी कुटुंबियांचे सांत्वन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते शेषनाथ कोळी (58) यांचे शनिवारी (दि.31) सायंकाळी अल्पशा आजारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील यांनी रविवारी थळमध्ये जाऊन कोळी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
अलिबाग तालुक्यातील थळमधील उंदेर आळी येथील शेषनाथ कोळी यांनी या परिसरात शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकवत ठेवण्याचे काम केले. पक्षवाढीसाठीदेखील त्यांचे योगदान राहिले आहे. राजकीय क्षेत्रात काम करीत असताना रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे संचालक, अलिबाग अर्बन बँकेचे संचालक अशी अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत. मच्छिमारांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्याचाही प्रयत्न त्यांनी केला.
पनवेलमधील रुग्णालयात त्यांच्या आजारपणावर उपचार सुरु होते. शनिवारी सायंकाळी त्यांचे अल्पशा आजारामुळे निधन झाले. थळमधील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, सहकार अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी, कार्यकर्ते, नातेवाईक, ग्रामस्थांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.