| पेण | प्रतिनिधी |
वाशी ग्रामपंचायतीच्या प्रचाराचा श्रीफळ वाढविल्यानंतर मार्गदर्शन करताना विष्णू पाटील रायगड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख यांनी सांगितले की, शिवसेना आणि शेकाप जेव्हा-जेव्हा एकत्र आली तेव्हा-तेव्हा या जिल्हयात एक वेगळे वातावरण पहायला मिळालेले आहे. कारण हे दोन्ही पक्ष तळागाळातील कष्टकरी शेतकरी जनतेच्या हिताचा विचार करणारे पक्ष आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता ही आमच्या सोबत राहील मी आणि आमदार जयंत पाटील एकत्र आलो म्हणजे समजून जा, आम्ही कुणालाही घाबरत नाही.
फक्त वाशी ग्रामपंचायत नाही तर इंडिया आघाडी रायगड जिल्हयातील 7 आमदार आणि रायगड रत्नागिरीचे खासदार अनंत गीते यांनाच निवडुन आणणार आम्ही फक्त निमित्त असू पण ही सुज्ञ जनता घेतलेल्या निर्णयाला योग्य तो न्याय देईल. आजपर्यंत या रायगडने वेगवेगळी सत्ता केंद्र पाहिली आहेत. ही सत्ता केंद्र एकत्र होऊ पाहत आहेत. या सत्ता केंद्रांना उलथून टाकण्याची ताकद शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेत आहे. असे विष्णू पाटील यांनी सांगितले.
यावेळी आमदार जयंत पाटील यांनी सांगितले की वाशी म्हणजे खारेपाटाचे प्रवेशद्वार आहे. या ग्रामपंचायतीचा विकास करण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळेविकास होणारच. खारेपाटावर माझे विशेष प्रेम आहे. मतदारांना आश्वासन देताना मला विचारून आश्वासन द्या. जयंत पाटील कधी खोटे आश्वासन देत नाही. आश्वासन आपण पुरे करण्यासाठी देतो. त्यामुळे विजय हा आपलाच आहे.
चिंता करण्याची गरज नाही, सेझचा लढा आपण जिंकलेला आहे असे त्यांनी सांगितले. आणि अनंत गीतेंना कोणत्या ही परिस्थितीत खासदार करण्याचे अश्वस्थ केले. यावेळी नेते मंडळींमध्ये माजी जि.प.अध्यक्षा सुप्रीया पाटील, महादेव दिवेकर, पी.डी. पाटील, निलकंठ दिवेकर, नरेश गावंड, समीर म्हात्रे, दिपश्री पोटफोडे, गजानन मोकल, नगरसेवक कृष्णा भोईर, प्रसाद पाटील , दिपक पाटील, मा.पं.स.सदस्य अनंत पाटील, योगेश मढवी, विनायक पाटील, राजेश पाटील, प्रवीण म्हात्रे, महेंद्र ठाकुर, सुनील पाटील अदींसह सर्व उमेदवार हजर होते.





