बिनविरोधसाठी संगीतखुर्चीचा खेळ सुरू; दर सहा महिन्यांनी नगराध्यक्ष बदल
| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर नगरपंचायतीच्या सातव्या नगराध्यक्षा म्हणून शिल्पा दरेकर यांची बिनविरोध जाहीर झाली. या निवडीनंतर शिल्पा दरेकर यांची आगामी केवळ सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निवड शिवसेना पक्षसंघटनेने करण्याचा निर्णय घेतल्याने उर्वरित दीड वर्षात अजून दोनवेळा नगराध्यक्षा होण्यासाठी संगीत खुर्चीचा खेळ होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
निवडणूक पिठासीन अधिकारी यांच्याकडे दाखल करताना शिल्पा देवेंद्र दरेकर यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शहरप्रमुख सुरेश पवार, सर्व शिवसेना व भाजप महायुतीच्या नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. प्रारंभी नगरपंचायत कार्यालयात स्वच्छतादूत स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन केले.
पोलादपूर नगरपंचायत कार्यालयात महाडचे प्रभारी प्रांताधिकारी संदिपान सानप यांचे स्वागत प्रभारी नगराध्यक्ष तथा विद्यमान उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले यांनी मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्या उपस्थितीत केले. यानंतर अधिकृतपणे शिल्पा देवेंद्र दरेकर यांची नगराध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.
बुधवारी सायंकाळी उशिरा शिवसेना संघटनेची बैठक झाली असता अस्मिता उमेश पवार, स्नेहल सचिन मेहता आणि शिल्पा देवेंद्र दरेकर या तीनही नगरसेविका नगराध्यक्षा होण्यासाठी इच्छुक असल्याचे पक्ष संघटनेच्या निदर्शनास आल्यामुळे तीनही नगरसेविकांना प्रत्येकी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येत्या दीड वर्षाच्या उर्वरित कालावधीत आणखी उर्वरित नगरसेविका स्नेहल मेहता आणि अस्मिता पवार यांना नगराध्यक्षा होण्याची संधी मिळण्यासाठी संगीत खुर्चीचा खेळ पाहण्याची वेळ पोलादपूरवासियांवर येणार आहे.