मुख्याधिकारी नगराध्यक्ष, नगरसेवकांना अतिक्रमण हटविण्याचे निवेदन
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहरातील अतिक्रमणामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीला तर अडथळा येतोच, मात्र पादचार्यांचीदेखील गैरसोय होते. त्यामुळे पाली बाजारपेठेत हटाळेश्वर चौक ते बस स्थानक व इतर ठिकाणी रस्त्यावर आलेली अतिक्रमणे हटविण्याबाबत बुधवारी (दि. 2) सायंकाळी शेकडो सह्यांचे निवेदन नगरपंचायत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व नगरसेवकांना देण्यात आले.
या निवेदनात म्हंटले आहे की आम्ही सर्व पाली नगरपंचायत हद्दीतील रहिवासी आहोत. नगरपंचायत स्थापन झालेपासून काही बदल नक्कीच छान झाले आहेत आणि त्याचे कौतुक सुद्धा आम्ही नागरिकांनी केले आहे. परंतु, काही बाबतीत प्रशासनाचे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 कलम 177 ते 182 नुसार कार्यवाही करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
पाली शहरात मोठ्या प्रमाणात भाविक बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी व तालुक्यातील नागरिक विविध कामांसाठी आणि विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल होतात. मात्र, पाली बस स्थानक जे दुरावस्थेत आहे, त्या ठिकाणाहून हटाळेश्वर चौक मार्गावर चालताना, गाड्या चालवताना त्या मार्गावरील व्यापारी अतिक्रमणामुळे नागरिकांना व भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हा मार्ग नागरिक, लहान मुले, स्त्रिया, प्रौढ व्यक्ती यांसाठी असुरक्षित बनला आहे.
येथील व्यापार्यांनी, आधी ओट्या तयार केल्यानंतर त्यांवर बांधकाम करून गाळे वाढविले, त्यापुढे पायर्या वाढविल्या, पुन्हा गाळे वाढविले. ज्या रस्त्यावरून समोरासमोरून दोन बस पास व्हायच्या तिथे आत्ता एक बस पास होताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिवाय, बस स्थानकापलीकडील रहिवासी प्रवास करताना त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पालीकरांना सन्मानाने आणि सुरक्षितपणे सदर रस्त्यावर चालून देण्याचा मूलभूत हक्क आणि अधिकार पुनर्प्रस्थापित करावा असे निवेदनात नमूद केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या येरुणकर यांना निवेदन देताना प्रदीप (दादू) गोळे, ऍड. नरेश शिंदे, अमित निंबाळकर, कृष्णा पालांडे व कपिल पाटील आदी नागरिक उपस्थित होते.
खरमरीत शब्दांत कानउघडणी
या निवेदनात म्हटले आहे की मुख्याधिकारी व लोकप्रतिनिधी दिवसातून किमान एकदातरी या मार्गावर येत जात असतात. परंतु,आपल्याला या समस्या जाणवत नाहीत, याचे आम्हाला जेव्हढे आश्चर्य वाटते तेवढीच चीडसुद्धा येते. परंतु, कोणीही त्या प्रकाराविरुद्ध, अतिक्रमणाविरुद्ध एक शब्द बोलत नाही, हे विशेष आहे.
कारण, ज्या जबाबदारी करिता आपण नियुक्त आहात, त्याच जबाबदारींकडे आपण पाठ फिरवत आहात असे आम्हाला दिसून आले आहे.
अर्ज व निवेदनांना केराची टोपली
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आपल्याकडे मागील दोन वर्षांपासून या आणि अशा अनेक समस्येसंदर्भात पाठपुरावा करत आहोत. परंतु, अशा समस्यांकडे, निकृष्ट कामांच्या तक्रारीकडे आपण लक्ष देत नाहीत किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहात. अर्ज, तक्रारी अर्ज, निवेदने याकडे पहायला आपल्याला कदाचित वेळ नाही किंवा निव्वळ प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण आपल्या आखलेल्या चौकटीत काम करायचं ठरवलेले आहे, असेच दिसते. त्यामुळे, आम्हाला आमच्या पालीचे विद्रुपीकरण, अतिक्रमण दूर करण्याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे.
पाली शहरात जी रस्त्यावर आलेली अतिक्रमण आहेत. त्यातील काही महत्वाची अतिक्रमण हटवण्यात आलेली आहे. याबरोबरच हटाळेश्वर चौक ते पाली बस स्थानकापर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण केलेल्यांना याआधी देखील नोटिस काढल्या आहेत आणि आतादेखील त्यांना व शहरातील इतर ठिकाणी असलेल्या अतिक्रमण करणार्यांना नोटीस काढण्यात येतील. त्यांची कागदपत्रे तपासून पंचनामा केला जाईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल.
– प्रणाली सूरज शेळके, नगराध्यक्षा, पाली नगरपंचायत