। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
गावागावांत सध्या शिमगोत्सव सुरू आहे. कोकणात शिमगोत्सवामुळे तरुणाईच्या उत्साहाला मोठे उधाण आले आहे. ढोलकी, डफ आणि तुणतुणे घेऊन ठिकठिकाणी ‘मांडा’वर तमाशा सादर केला जातो. घरोघरी गोमूचा नाच आणि तमाशा सुरू आहे. मुंबईत चित्रपट सृष्टीमध्ये सहकलाकाराची भूमिका बजावणारे महेश मडव जांभवडे गावातील टेंमवाडीचे रहिवासी आहेत. अलीकडे दोन-तीन वर्षे ते आपल्या गावाकडे येऊन अदाकारी सादर करीत आहेत. या अदाकारीतून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे. त्यांनी परिधान केलेली वेशभूषा ही एका तरुणीला लाजवणारी आहे. आपल्या अदाकारीने ते आबालवृद्धांनाही घायाळ करत आहेत. महेश यांच्या अदाकारीने कनेडी पंचक्रोशीमध्ये उत्साह आणला आहे. सोमवारी कनेडी बाजारपेठेत सादर केलेले त्यांचे नृत्य समाजमाध्यमांवर प्रचंड ‘व्हायरल’ झाले. अनेकांनी ‘स्टेटस’लाही त्यांचे व्हिडिओ ठेवून त्यांच्या नृत्याला दाद दिली.
होळीचा पाच दिवसांचा उत्साह होळीच्या पाच दिवसांत गावोगाव उत्साह असतो. या पाच दिवसांत शेतीची कामे केली जात नाहीत. गावात कोण काम करत असेल तर त्यांच्याकडून 'शबय' वसूल केली जाते. रात्री आठपासून गावातील 'मांडा'वर तमाशा सादर केला जातो. पारंपरिक पद्धतीने तमाशात सोंग आणले जाते. सध्याच्या समाजमाध्यमांच्या काळात आजही या तमासगीर कलाकारांच्या सादरीकरणाला चांगली दाद मिळत आहे. महेश मडव यांनी सादर केलेले नृत्य सर्वांना घायाळ करीत आहे. त्यांच्या या नृत्याला परिसरातून मागणी वाढू लागली आहे.