अल्पसंख्याक विभागाला 500 कोटींचा निधी
| मुंबई | वृत्तसंस्था |
अल्पसंख्याक विभागातील मुलांच्या शिक्षणासाठी 500 कोटी रुपयांचा निधी मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला आहे. पूर्वी हा निधी 30 कोटी रुपये होता. तो आता 500 कोटी रुपये करण्यात आला आहे, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाच्या सहाय्याने राज्यातील मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या कर्ज योजना चालविण्यात येतात. या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘एनएमडीएफसी’कडून कर्ज घेण्यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची शासन हमी मर्यादा 8 वर्षांसाठी 30 कोटींवरून 500 कोटी इतकी वाढविण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. रक्कम वाढविण्याबाबतचा प्रस्ताव अब्दुल सत्तार यांच्या सूचनेनुसार महामंडळामार्फत अल्पसंख्याक विभागास सादर करण्यात आला होता.
अल्पसंख्याक बांधवांच्या हिताचा हा निर्णय होण्यासाठी तसेच अल्पसंख्याक समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर 31 ऑगस्ट रोजी बैठक झाली होती. जमात-ए-उलेमा हिंद संघटनेचे दिल्लीतील अध्यक्ष मौलाना सय्यद मेहमूद मदानी यांच्याशी झालेल्या पूर्वचर्चेनुसार विविध मागण्यांबाबत त्या बैठकीत चर्चा झाली होती.