शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा शेकापक्षात पक्ष प्रवेश सुरुच

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शिंदे गटातील असंख्य कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये शिंदे गटाला भगदाड पडत आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भोनंग येथील शिंदे गटातील गंगाराम शेळके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि.1) हा पक्षप्रवेश सोहळा प्रचाराच्या सभेच्या वेळी पार पडला.

अलिबाग तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून काम करणाऱ्या शेकापमध्ये शिंदे गटातील कार्यकर्ते येत असल्याचे चित्र आहे. भोनंग येथील गंगाराम शेळके यांच्यासह शांताराम शेळके यांनी शिंदे गटातील कार्यकर्ते म्हणून काम केले. परंतु, त्यांना विश्वासात न घेता आमदारांकडून काम केले जात आहे. त्यामुळे आमदारांच्या मनमानी कारभाराला कंटाळून गंगाराम शेळके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला रामराम ठोकला आहे. अलिबाग तालुक्यातील कावीर जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार मोहन धुमाळ यांच्या प्रचारार्थ भोनंग येथे सभा घेण्यात आली. या सभेदरम्यान गंगाराम शेळके यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेकापमध्ये कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरू झाल्याने शिंदे गटाला धडकी भरली आहे.

Exit mobile version