| पाताळगंगा | प्रतिनिधी |
राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’ (सूक्ष्म सिंचन) अंतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. कृषी आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्ह्यात 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ठिबक व तुषार सिंचनाचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या योजनेचा जास्तीत जास्त पात्र व गरजू शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड वंदना शिंदे यांनी केले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावा. अर्जासाठी महाडीबीटी शेतकरी पोर्टल उपलब्ध आहे. https://mahadbt.maharashtra. gov.in/Farmer/AgriLogin संकेतस्थळावर भेट द्यावी.
अर्ज भरताना शेतकऱ्यांनी माहिती अचूक भरणे आवश्यक असून, चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. अर्जांना ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार प्रक्रिया केली जाणार आहे. अर्जासाठी ग्रीस्टॅक फार्मर आयडी, आवश्यक शासकीय ओळखपत्रे, बँक पासबुक तसेच जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्याला कमाल पाच हेक्टर क्षेत्रापर्यंत योजनेचा लाभ घेता येणार आहे. ऑनलाइन अर्जासाठी सीएससी केंद्र, सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.






