शिंदे गट-भाजपात भडकले शीतयुद्ध?

दिलीप भोईर यांना आमदारकीचे डोहाळे

। रायगड । खास प्रतिनिधी ।

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असतानाच विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष एकसंघ असले, तरी भाजपा आणि शिंदे गटामध्ये कमालीची धुसफूस असल्याचे दिसून येते. लालबावटा सोडून कमळ हाती घेतलेल्या दिलीप भोईर यांना आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. यासाठी ते शिंदे गटाच्या स्थानिक आमदारांसमोर आव्हान उभे करण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करत असून, त्याला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपामध्ये चांगलेच शीतयुद्ध भडकले असल्याचे सध्या चित्र दिसत आहे.

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मित्रपक्ष असलेला भाजपा साथ देणार नाही हे गृहीत धरुन स्थानिक आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे यांची सोबत घेतल्याचे बोलले जाते. शिंदे गट हा अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघामध्ये विकासकामे करत असल्याचा आव आणत आहे. परंतु, भविष्यात एकटा लढण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास आपल्याकडे उमेदवार असायला पाहिजे यासाठी त्यांनी दिलीप भोईर यांना पक्षात घेतले. त्यांना बळ देण्याचे काम भाजपाकडून सुरु आहे. त्यामुळे आपणच विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होणार, अशी मुंगेरीलालची स्वप्नं त्यांना पडत आहेत.

शिंदे गटाची ताकद आहे त्या ठिकाणी भोईर घुसखोरी करत असल्याच्या ढीगभर तक्रारी आमदारांना प्राप्त होत आहेत. दररोज कार्यकर्त्यांकडून येणाऱ्या तक्रारी ऐकून स्थानिक आमदार चांगलेच संतप्त होत असल्याचे बोलले जाते. याउलट भोईर यांना धडा शिकवण्यासाठी शिंदे गटदेखील विविध मार्गाने प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये सुरु असलेल्या शीतयुद्धाचा फायदा हा इंडिया आघाडीला निश्चित असल्याचे मानले जाते. भोईर यांना पक्षात घेतल्याने भाजपातील काही जुने नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. त्यामुळे त्यांची मदत भोईर यांना होईल असे चित्र दिसत नाही. यासाठीचे ते शिंदे गटातील मतांवर डोळा ठेवून असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ‌‘दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ’ या म्हणीप्रमाणे इंडिया आघाडीसाठी असे वातावरण पोषक असल्याचे दिसून येते.

Exit mobile version