। मुंबई । वृत्तसंस्था ।
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत काल (दि.२३) उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंना दिलासा देत शिंदे गटाला धक्का दिला आहे. तसेच दसरा मेळाव्याला शिवसेनेला परवानगी नाकारणारा मुंबई महापालिकेचा निर्णय हा अयोग्य असल्याचं न्यायालयाने नमूद केलं आहे. यामुळे शिवसेनेत उत्साहाचं वातावरण आहे, तर शिंदे गट मात्र नाराज आहे. मुंबई महापालिकेने या मेळाव्याला परवानगी न देण्याचा निर्णय कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग असल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं होतं.
काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याकडून मुंबईकडे निघाले होते. तेव्हा माध्यमांनी त्यांना न्यायालयाच्या याच निकालावर प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदेंनी हातवारे करत “प्रवक्ते बोलतील”, एवढंच उत्तर दिलं. पत्रकारांच्या इतरही प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलं नाही.
उच्च न्यायालयाच्या दसरा मेळाव्यासंदर्भातल्या निकालावरुन शिवसेनेने आनंद व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे दसरा मेळाव्याच्या निर्णयामुळे शिंदे गटात प्रचंड नाराजी आहे.
‘‘दसरा मेळावा ही आपली परंपरा आहे. शिवसैनिक आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी दसरा मेळाव्यासाठी उत्साहात, गुलाल उधळत वाजत गाजत या,’’
उद्धव ठाकरे,
शिवसेना पक्ष प्रमुख