बालेकिल्ल्यातच शिंदेंना घाम

| ठाणे | प्रतिनिधी |

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्येच शिवसेनेची कोंडी झाली आहे. भारतीय जनता पक्षाने ताणून धरल्याने अद्याप ठाणे, पालघरच्या जागांचं घोडं अडलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा शिंदेंच्या शिवसेनेने अद्याप तरी केलेली नाही.

मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना कोकण पट्ट्यातून धनुष्यबाण गायब होताना दिसत आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत असल्याने आणि रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे त्यांच्यासोबत असल्याने रायगडची जागा राष्ट्रवादीला गेली. तर रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये किरण सामंत यांच्या रुपात तगडा उमेदवार असतानाही शिवसेनेने माघार घेत ही जागा भाजपला सोडली. इथून भाजपने नारायण राणेंना तिकीट दिलं आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगडनंतर आता ठाणे जिल्ह्यात ‘धनुष्यबाण’ संकटात येण्याची चिन्हं आहेत. कल्याण, ठाण्यापैकी एक जागा सोडा यासाठी शिंदेंवर दबाव आहे. कल्याणमध्ये शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे आहेत. त्यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली नाही. तर ठाण्याचे खा. राजन विचारे पक्षफुटीनंतरही उद्धव ठाकरेंसोबत असल्याने इथे शिंदे उमेदवाराच्या शोधात आहेत. आ. प्रताप सरनाईक यांचे नाव आघाडीवर आहे.

लेकाची खासदारकी आणि राजकीय गुरुंची कर्मभूमी वाचवण्याची धडपड सध्या शिंदे करत आहेत. शिवसेनेला सर्वप्रथम सत्ता ठाण्यातच मिळाली. शिंदेंचे राजकीय गुरु आनंद दिघेंनी ठाण्यात सेना रुजवली, वाढवली. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते ठाणे जिल्हाप्रमुख राहिले. त्यामुळे गुरुंनी जपलेला, भाजपकडून खेचून आणलेला बालेकिल्ला भाजपला सोडण्यास शिंदे तयार नाहीत. तर दुसरीकडे मुलाचं राजकीय करिअर संपू नये यासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. श्रीकांत शिंदे 2014 पासून कल्याणचे खासदार आहेत.

Exit mobile version