शिंदेंना हवाय अडीच वर्षे महापौर?

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. मात्र, भाजप-शिवसेना महायुतीने मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला असून, भाजपने 89 तर तर शिंदेंच्या शिवसेनेने 29 जागा जिंकल्या आहेत. मात्र, निकालानंतर शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यातच, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुंबईतील नगरसेवकांना संपर्क साधला जात असल्याची चर्चा आहे. आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी, अडीच वर्षे महापौरपद शिवसेनेला घेण्यासाठी हे सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

ठाकरेंच्या संपर्कामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक मुंबईतील ताज लँड्स अँन्ड हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहेत. ठाकरेंच्या हालचालींमुळे शिंदेंना धोका किंवा संधी मिळेल, अशा चर्चा सुरु आहेत. बार्गेनिंग पॉवर वाढल्याने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपकडे महापौरपदाची मागणी करण्यात आल्याच्या चर्चाही होत आहेत. स्थायी समितीसह इतर समित्यांसाठी देखील शिवसेना आग्रही राहू शकते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षामुळे मुंबईत शिवसेनेचा महापौर असावा, अशी एकनाथ शिंदेंची इच्छा आहे. त्यामुळे, अडीच वर्षे महापौरपद एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मागण्यात येत असल्याची चर्चा आहे. मात्र, या चर्चेवर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, आमचे पार्लमेंटरी बोर्ड आहे, तिथे जी काही मागणी आहे ती येईल, माझ्याकडे तरी काही मागणी आलेली नाही. आमच्या पार्टमेंटरी बोर्डच्या बैठकीत एकनाथ शिंदे हेही आहेत. आमच्या समन्वय समितीमध्ये देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे एकत्रित बसून निर्णय घेतील. जर मागणी असेल तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

Exit mobile version