नवी मुंबईत भाजपाची एकहाती सत्ता
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत तब्बल 65 जागांवर विजय मिळवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र 41 जागांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे नवी मुंबईत गणेश नाईक यांचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, शहरात ‘नाईकांनी शिंदेंचा टांगा पलटी घोडे फरार केले’ अशी चर्चा रंगली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी निवडणुकीपूर्वीच पक्षश्रेष्ठींकडे शिवसेनेशी युती न करण्याचा आग्रह धरला होता. युती आणि जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाल्याने भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. जागावाटपावरून भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यात तीव्र वाद झाला होता. याच पार्श्वभूमीवर नाईक यांनी ‘111 जागा जिंकून दाखवा, मी राजकारण सोडेन’ असे आव्हान दिले होते. निवडणूक काळात ही लढत प्रत्यक्षात गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे अशीच असल्याचे चित्र होते. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार, आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय इशारे पाहायला मिळाले. नाईक कुटुंबियांनी संपूर्ण ताकदीने प्रचारात उतरत भाजपची बाजू भक्कम केली.
माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह कुटुंबियांचा सक्रिय सहभाग लक्षवेधी ठरला.
संजीव नाईक यांनी विरोधकांवर खोचक टीका करत भाजपच्या विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत गणेश नाईक यांना दिलेले पाठबळही भाजपसाठी निर्णायक ठरल्याचे मानले जात आहे. या निकालामुळे नवी मुंबईत भाजपचे वर्चस्व कायम राहिले असून, गणेश नाईक यांच्या नेतृत्वाला मोठा राजकीय बूस्ट मिळाला आहे
