6 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
| उरण | प्रतिनिधी |
नुकत्याच पार पडलेल्या उरण नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) पक्षाला जोरदार झटका बसला असून, तब्बल 6 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये शिंदेसेनेच्या उमेदवारांची संख्या अधिक असल्याने उरणमध्ये या गटाची राजकीय ताकद किती पोकळ आहे, हे जनतेने ठणकावून सांगितले आहे.
उरण हा मावळ लोकसभा मतदारसंघात येतो आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार म्हणजे अनेकवेळा ‘संसद रत्न’ पुरस्काराने सन्मानित खासदार श्रीरंग बारणे हे आहेत. मात्र, त्यांच्या मतदारसंघातच पक्षाच्या उमेदवारांना दारुण पराभव स्वीकारावा लागला, ही बाब उरणच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
उरण नगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 53 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी नगराध्यक्ष व 21 नगरसेवक असे 22 उमेदवार निवडून आले, तर 32 उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. यामधील 6 उमेदवारांना किमान मतेही मिळू न शकल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यात डिपॉझिट जप्त झालेल्यांमध्ये शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे उमेदवार अधिक असल्याने उरणमध्ये या पक्षाची संघटनात्मक ताकद शून्याच्या घरात असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना फुटीनंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत उबाठा आणि शिंदे गटामध्ये थेट लढत होऊन बारणे विजयी झाले होते. मात्र, उरण पालिका निवडणुकीत तो ‘विजयाचा करिष्मा’ पूर्णपणे गायब झाल्याचे चित्र दिसले. खासदार बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने ही निवडणूक लढवली होती. तुषार ठाकूर आणि रुपाली ठाकूर या पतिपत्नीला थेट पक्षप्रवेश देत रुपाली ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, निकाल जाहीर होताच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रुपाली ठाकूर यांचेही डिपॉझिट जप्त झाले. त्यांच्यासोबत अपक्ष नगराध्यक्ष उमेदवार नसरीन इसरार शेख यांचाही डिपॉझिट जप्त झाला आहे. नगरसेवकांमध्ये अनंत कोळी, हंसराज चव्हाण, मुकरी अश्मील मोहम्मद अली (सर्व शिवसेना शिंदे) व अंजली खंडागळे (वंचित बहुजन आघाडी) यांचा समावेश आहे.
