| करमाळा | प्रतिनिधी |
करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला चांगलाच धक्का बसला आहे. लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून माजी आमदार नारायण पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. तेव्हापासून नारायण पाटील हे महायुतीसोबत राहणार की महाविकास आघाडीत जाणार? याविषयी चर्चा रंगल्या होत्या. माजी आ. नारायण पाटील हे शिवसेनेमध्ये फूट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर गेले होते. नारायण पाटील यांनी शिवसेनेला सोडणे हे माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीला एक मोठा धक्का बसला आहे. नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अकलूज येथे भेट घेतली असून ते 26 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.