एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री, फडणवीस उपमुख्यमंत्री
राजभवनवर शपथविधी संपन्न
। मुंबई । प्रतिनिधी ।
राजकीय बंडखोरीने ग्रासलेल्या महाराष्ट्राला गुरुवारी (30 जून) एका मागून एक धक्के बसत गेले. एकनाथ शिंदे यांची अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदावरुन निवड केल्याचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करुन मोठा धक्का दिला. त्या धक्क्यातून सावरत नसतानाच त्यांनी आपण या मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे सांगत सलग दुसरा धक्का दिला. मात्र, त्यानंतर अवघ्या दोन तासातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी या मंत्रिमंडळात फडणवीस हे उपमुख्यमंत्री असतील असे ट्विट करीत त्यांना सहभागी होण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सायंकाळी राजभवन येथे शिंदे आणि फडणवीस यांचा शपथविधी संपन्न झाला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोघांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.या शपथविधीने बंडखोरीचा एक अध्याय समाप्त झाला.
आता मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला नेमके काय स्थान आहे.कुणा कुणाची मंत्री म्हणून निवड होते यावरुन नेमका काय वादविवाद होतो हे पाहणे इष्ट ठरणार आहे. त्यानंतरच या प्रकरणाचा दुसरा अध्याय सुरु होणार आहे. दरम्यान, राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात शिंदे यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण करुन शपथ घेतली. तर फडणवीस यांनी ईश्वरास स्मरुण शपथ ग्रहण केली. शिंदे यांच्या रुपाने ठाण्याला प्रथमच मुख्यमंत्रीपद मिळाले आहे.
पवारांकडून अभिनंदन
एकनाथ शिंदे यांच्या मुुख्यमंत्रीपदाच्या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत,असेही पवारांनी म्हटले आहे.
अन शिवसेनेची हवाच निघाली
राजभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून वेगळा संसार मांडायचा ठरवले तेव्हा शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. भाजपसोबत जाऊन एकनाथ शिंदे फार तर उपमुख्यमंत्री होतील, असे म्हटले जात होते. त्यासाठी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला पदावरून खाली खेचले, असा सूर सातत्याने शिवसेनेकडून लावला जात होता. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना देऊन शिवसेनेच्या या टीकेतील सर्व हवाच काढून घेतली आहे.
अखेरचे निर्णय अवैध
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला मंजुरी दिली होती. तसेच नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासही मंत्रिमंडळाने परवानगी दिली होती. मात्र, हे निर्णय अवैध असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाचे पत्र पाठवल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घ्यायची नसते. तरीही उद्धव ठाकरे यांनी ही बैठक घेऊन निर्णय घेतले. त्यामुळे हे निर्णय अवैध ठरले आहेत. आता हे निर्णय पुन्हा नव्याने घ्यावे लागतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्याचा सर्वांगिण विकास, सर्व मतदार संघात समतोल विकास साधणे,जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे याला माझे प्राधान्य राहणार आहे.
– एकनाथ शिंद, मुख्यमंत्री
लवकरच आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करु. या विस्तारात शिंदे यांच्यासोबत असलेले, अपक्ष आणि भाजपाचे सर्व लोक या मंत्रिमंडळात येतील.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
शिंदे समर्थकांचा जल्लोष
एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रपदी निवड होणार असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करताच गोव्यात हॉटेल ताजमध्ये तळ ठोकून असलेल्या शिंदे समर्थक आमदारांनी एकच जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला.